सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्यांसाठी 1 मे ते 23 मेपर्यंत विशेष मोहीम राबविली गेली. यात ट्रॅफिक पोलिसांनी शहरवासीयांना 30 लाख 45 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी 3 लाख 45 हजार 300 रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेने वसूल केला. अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी दिली.
शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातून जड वाहतुकीला बंदी घालण्यात शहरातील मोठ्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास सहाय्य मिळाले. शहरात सध्या जड वाहतुकीस मध्य भाग वगळता दुपारी 1 ते 4 यावेळेत वाहतुकीची परवानगी दिली आहे.
मोटारसायकल चोरीवर आळा घालण्यासाठी शहरात 3 दिवस विशेष मोहीम सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आली. यामध्ये 4 हजार मोटारसायकली तपासण्यात आल्या. त्यामध्ये 15 वाहने ही संशयास्पद आढळली. त्याचा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांशी संपर्क करुन सर्व तपशील नोंद करण्यात आला. याचा तपास सुरू आहे.
रिक्षातून प्रवास करणार्या नागरिकांना रिक्षाचालक हे त्रास देतात व लूट करतात. यात अनेक प्रवासी हे बाहेरुन आल्याने त्यांना तक्रारीसाठी वेळ नसतो. याचा फायदा रिक्षाचालक घेत आहेत. असे समजल्याने शहर वाहतूक शाखेने अचानक रिक्षांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविली. या मोहिमेत 200 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ट्रिपलसीट, गाडीवरून मोबाईलवर बोलणारे व राँगसाईडने जाणार्या अशा अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच पुन्हा तो गुन्हा करताना आढळल्यास गाडी ताब्यात घेऊन कोर्टामार्फत कारवाई करण्यात आली. अशा 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 1 मे 2022 पासून ते आजतागायत ई-चलन मशिनव्दारे एकूण 4621 केसेस करण्यात आल्या.