Uncategorized

मास्क कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सोडले कुत्रे; एक पोलिस जखमी

Pudhari News

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क अनिवार्य आहे. मात्र तरीही अनेकजण विनामास्क वावरताना आढळून येत असतात. अशाच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणास गेलेल्या पोलिसांच्या अंगावर तिघा परप्रांतीयांनी कुत्री सोडल्याची अमानुष घटना डोंबिवलीत घडली. यावेळी कुत्र्याने एका पोलिसाच्या पायाचा लचका तोडून त्याला जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन परप्रांतीयांवर गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. यातील अन्य एकजण पसार झाला असून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत.

वाचा ः कोरोना दुसरी लाट : राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या विनाकारण फिरणारे आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने कारवाई पथक कारवाईसाठी फिरत असताना विचित्र प्रकार घडला. खंबाळपाडा रोडला एका ठिकाणी गणेश ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज सुरु होते. या गॅरेजसमोर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क परिधान केला नव्हता. या दुकानात दोन पाळीव कुत्रे होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना मास्क न घातल्याने पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या तिघांनी आरडाओरडा करत कारवाईस विरोध केला.

वाचा ः राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर

पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना तिघांकडून धक्काबुक्की करण्यात आली. एका कुत्र्याला छू म्हटल्याने त्या कुत्र्याने अनिल तायडे या पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला कडाडून चावा घेतला. तायडे यांना कुत्रा चावल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू केली आहे. यातील आनंद गुप्ता आणि सत्यनारायण गुप्ता या दोघांना अटक केली. घटनास्थळाहून पळ काढलेल्या आदित्य गुप्ता याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

SCROLL FOR NEXT