Uncategorized

सोशल मीडियावर चॅटिंग करतानाच्या सेफ्टी टिप्स

अंजली राऊत

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो

आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरुवात मोबाइलपासून होते. मेसेज करणे, आलेल्या मेसेजेसला रिप्लाय करणे त्यापैकी काही कामानिमित्त, तर काही आवडत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी चॅटिंग केले जाते. चॅटिंगचा उपयोग कधी हनी ट्रॅपसाठी, तर कधी स्क्रीनशॉट काढून ब्लॅकमेल करण्यासाठी, तर कधी व्यवसाय मार्केटिंगचा भाग म्हणून अनोळखी व्यक्तीशी थेट चॅटिंग करावे लागते. एकटेपणाचा फायदा घेऊन भावनांशी खेळत फसवणूक केली जाते. अशावेळी समोरची व्यक्ती चांगली आहे की, फसवणूक करते, हे कसे लक्षात घ्यावे? त्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करत चॅटिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत काही सेफ्टी टिप्स बघू या…

१) छाेटा व्यवसाय करणारे व्यावसायिक प्रॉडक्टविक्री व प्रमोशनसाठी विविध सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करतात. प्रॉडक्टविषयी माहिती / पोस्ट फेसबुक, व्हॉट्सॲपवर टाकून विक्री करतात पण चौकशीसाठी ग्राहक डीएम (डायरेक्ट मेसेज) करतात. त्यातील काही खरे तर काही फेक अकाउंटवरून केवळ टाइमपास म्हणून चॅटिंग करतात. प्रॉडक्टची माहिती देणे व्यावसायिकाचे कर्तव्य असते. माहिती देण्यासाठी बिझनेस व्हॉट्सॲपचा वापरा करा. यामध्ये व्यवसायाची प्रोफाइल तयार करून खरेदीदाराला व्यवसायाची संपूर्ण माहिती मिळते व क्विक ऑटोमॅटिक रिप्लायमुळे प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. त्यासाठी चॅटिंग करण्याची गरज राहात नाही.

२) स्मार्ट फोनला स्क्रीनशॉटचा पर्याय असल्याने चॅटिंग करताना स्क्रीन शॉट काढले जातात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करताना योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. भावनेच्या भरात किंवा रागात चुकीचे शब्द वापरल्यास स्क्रीनशॉट काढून व्हायरल होऊ शकतात. त्यावरून ब्लॅकमेल केले जाऊ शकते. कोणत्याही व्यक्तीशी चॅटिंग करताना महत्त्वाची माहिती टाइप करून मेसेजच्या माध्यमातून पाठवू नये. महिलांशी बोलताना योग्य त्या शब्दांचा वापर करावा.

३) लिहिण्याला मर्यादा येतात, बोलण्याला कधीही मर्यादा नसतात. चॅटिंग करताना बऱ्याचदा गैरसमज होण्याची शक्यता असते. प्रत्येकाची भाषा, भाषेतील शॉर्टकट वापरण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे आपले म्हणणे समोरच्याला कळेलच असे होत नाही. त्यातून चुकीचा मेसेज, समज होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी 'एका वाक्यात उत्तरे' या पर्यायाचा उपयोग करून कामापुरता चॅटिंग करावे. गप्पा मारण्याच्या भानगडीत न पडता फोन करून बोला.

४) हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार आजवर उघडकीस आले आहेत. मोबाइल नंबर मिळवून जुजबी माहिती दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खात्री पटते. मग चॅटिंगला सुरुवात होते. भावनांचा गैरफायदा घेऊन सर्व महत्त्वाची माहिती काढून घेतली जाते. त्यानंतर ब्लॅकमेलिंगला सुरुवात होऊन पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग न करता सारखे मेसेज येत असतील, तर ब्लॉक करावे.

५) एकदा चॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर बराच वेळ निघून जातो, तरी लक्षात येत नाही. ती एक प्रकारची सवय लागण्याची शक्यता असते. ग्रुप चॅट असो किंवा आवडत्या व्यक्तीसोबत मारलेल्या गप्पा. एकदा बोलायला सुरुवात झाली की, अनेक विषय निघतात मग बोलणे वाढत जाते आणि इतर कामे बाजूलाच राहून जातात. त्यामुळे चॅटिंगची सवय पर्यायाने व्यसन लागणार नाही, याची काळजी घ्यावी. कामापुरता कमीत-कमी गरजेपुरता चॅटिंगचा वापर करावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT