मनसेचे सरचटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी 'शिवसेना नेते रामदास कदम यांना शिवसेनेत कवडीची किंमत राहिलेली नाही. मातोश्रीवर कोणी विचारत नसल्याने आपल्या माणसाना पुढे करून रामदास कदम स्वतःचे सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या बाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला.' असा आरोप खळबळजनक आरोप आजच्या ( दि. १८ ) पत्रकार परिषदेत केला.
याचबरोबर वैभव खेडेकर यांनी सोमय्या यांना त्यांचे मित्र कदम यांच्या देखील मालमत्तेची ईडी कडून चौकशी लावावी असे जाहीर आव्हान दिले.
'खेड पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांवर रामदास कदम यांनी दबाव टाकून माझ्या विरोधात तक्रारींच्या प्रस्तावावर सह्या करण्यास त्यांना भाग पाडले. तरीसुद्धा मला अपात्र करण्याचा कट मी उलथवून टाकेन. मुंबई उच्च न्यायालयाने मला बाजू मांडण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. न्यायालयासमोर आम्ही माझ्या विरोधातील तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेत कदम यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे पुरावे दिले आहेत.' अशी माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि १८ रोजी पालिकेच्या नगराध्यक्ष कक्षात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेवेळी ते म्हणाले, वैभव खेडेकरांचे पद घालवणार आशा काही लोकांनी भीष्मप्रतिज्ञा केल्या. यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचण्यात आले. मात्र मी आता त्यांचा डाव उलथवून टाकला आहे. ज्यांच्या सह्यानी माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या त्यांनी खासगीत मला भेटून आम्ही रामदास कदम यांच्या दबावाखाली सह्या केल्याचे सांगितले आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'माझ्या विरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली. ती माहिती रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याची चौकशी होणे गरजेचे आहे.'
माझ्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी कायद्याच्या कक्षेत करण्यात आलेली नाही. चौकशी प्रक्रिया बेकायदेशीरपणे आठ महिने चालवण्यात आली. ही चौकशी सुरू असताना अनेक वेळा या प्रक्रियेत कोणताही संबंध नसताना रामदास कदम यांनी सातत्याने पत्र पाठवून हस्तक्षेप केला आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्यानेच मी या बेकायदेशीर चौकशी प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.
दि १५ व १६ रोजी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आता मला नगरविकास विभागाकडून देण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत आणखी पंधरा दिवस वाढ केली आहे. तसेच यापुढे नगरविकास विभागाकडून माझ्या प्रकरणी होणाऱ्या पुढील करवाईकडे लक्ष ठेवणात आहे. उच्च न्यायालया समोर आम्ही माझी चौकशी कशी बेकायदेशीर झाली आहे व त्यामध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप यांचे पुरावे दिले आहेत. रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे.
मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याविरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचा कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत मी केलेल्या कामामुळे व विकास कामे यामुळे जनता माझ्या सोबत आहे.
दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.