Uncategorized

India@75 : राजगुरु आणि भगतसिंह यांच्‍यातील संवादाने कारागृहाच्‍या भिंतीही शहारल्‍या हाेत्‍या

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अंगार म्हणून ज्यांचा इतिहासात उल्लेख केला जातो. ते म्हणजे भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू. या तीन क्रांतीकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजांविरोधातील शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा मार्ग सोडून या तिघांनी सशस्त्र लढा उभा केला होता. लाहोर तुरूंगात राजगुरू यांनी अन्नत्याग केल्यानंतर भगतसिंह त्यांना भेटायला आले होते. यावेळी राजगुरु आणि भगतसिंह यांच्‍यातील संवादामध्‍ये कारागृहाच्‍या भिंतीही शहारल्‍या हाेत्‍या.

राजगुरु यांनी अन्‍नत्‍याग साेडण्‍यासाठी भगतसिंह यांनी काढली समजूत

अन्नत्यागामुळे राजगुरू यांची प्रकृती तोळामासा झाली होती. त्यांना सर्वजण अन्नत्याग सोडण्याची विनंती करत होते. मात्र, त्यांनी सर्वांची विनंती धुडकावून लावली होती. अखेर भगतसिंह यांनी त्यांची समजूत घालताना म्हटले की, "मेरे आगे भागना चाहते क्या बच्चू ?", "मैं तो चाहता था, तेरे लिए एक कमरा बुक कर दूँ ! पण नोकराशिवाय तू प्रवास करणार नाहीस असे वाटते. तेरा सामान उठाने के लिए कोई तो चाहिए ना !" "अच्छा, चल दूध पी ले ! वादा करता हूँ कि तुझसे सामान नही उठाऊंगा !", असेही भगतसिंह म्‍हणाले हाेते. देशासाठी प्राणाची आहुती देण्‍यापूर्वी दाेन क्रांतीकारकांनी केलेल्‍या संवाद हा त्‍यांच्‍यामध्‍ये असणार्‍या असीम धैर्याचीच ओळख करुन देताे.

मुलगा पराक्रमी आहे, तुमच्या घराण्याचे नाव मोठे करेल

पुण्याजवळील खेड (आताचे राजगुरूनगर) या गावी शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. शिवराम लहानपणापासून खोडकर व शीघ्रकोपी होता. त्याला अभ्यासात फार रूची नव्हती. एके दिवशी एक वृद्ध ज्योतिषी घरी आला असता हरीभाऊंनी शिवरामची पत्रिका त्या ज्योतिषाला दाखवली. ज्योतिषांनी बराच वेळ पत्रिका बघून सांगितले की, हा मुलगा पराक्रमी आहे. तुमच्या घराण्याचे नाव मोठे करेल. यावर हरीभाऊ म्हणाले की, अभ्यास न करण्याचा पराक्रम तो वारंवार करतो. बाकी कुठलेच गुण याच्यामध्ये दिसून येत नाहीत. यावर त्या ज्योतिषीने नुसती हासून दाद दिली हाेती.

राजगुरूंची जन्मखोली

सहनशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग

शिवरामच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल तिरस्कार होताच. इंग्रजांना नमविण्यासाठी आपण शारीरिकदृष्टया बलवान असायला हवे. त्यासाठी व्यायाम करायाला हवा, असा निर्धार शिवराम यांनी केला. भीमा नदीत पोहून हात पाय पुरेसे तयार झाले होते. त्यांना व्यायामाची जोड मिळाली. त्याचबरोबर सहनशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहायला लागला. बुक्कीने नारळ फोडणे, कडू काकडी कचाकचा खाणे, या सारख्या गोष्टी करून शिवराम संघर्षासाठी तावून सुलाखून तयार होऊ लागला. शिवरामची उंची ५-६ फूट होती. रंग सावळा, गाल बसलेले, गालाची हाडे किंचित वर आलेली, शरीर लोखंडी कांबेसारखे होते.

राजगुरूनगर येथील नदीकाठचा वडिलोपार्जित वाडा

अल्पावधीतच राजगुरू पक्के लक्ष्यवेधी झाले

दरम्यानच्या काळात अमरावतीला हनुमान प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबिरात राजगुरूंनी आपले नाव घातले. राजगुरू अमरावतीला गेले. मंडळाचे उन्हाळी शिबिर गावाबाहेर असलेल्या पन्नालाल उद्यानात भरत असे. येथे राजगुरूंनी रीतसर शिक्षण प्राप्त करून ते व्यायाम विशारद झाले. यावेळीच अकोट तालुक्यातील हिवरखेड गावाचे रहिवासी लच्छुलाल हे आपली बंदूक घेऊन शिबिरासाठी आले होते. हे नवे शस्त्र राजगुरूंना आवडले. धनुष्य बाणापेक्षा हे अधिक प्रगत शस्त्र होते. राजगुरूंनी या तरुणाची ओळख करून घेतली. फावल्या वेळात लच्छुलालच्या बंदुकीचा त्यांनी मनसोक्त वापर करून घेतला. अल्प काळातच राजगुरू पक्के लक्ष्यवेधी झाले.

संदर्भ – क्रांतिकारक राजगुरू, लेखक सच्चिदानंद शेवडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT