पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील लहुलसे गावातील एका लाकडी घराला आग लागली. या आगीमध्ये सहा खोल्याचे नुकसान झाले. काल (रविवार) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ग्रामस्थांनी लगतच्या नदीतून पाणी आणत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब रात्री घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमनच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर रात्री अशीरा नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले.
तालुक्यातील लहुलसे गावात या पूर्वी चार घरांना आग लागल्याची घटना घडली होती. या वेळी औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र घटनास्थळी पोहचे पर्यंत एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने पोलादपूर तालुक्यासाठी स्वतंत्र अद्यावत अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे बनले आहे.
अधिक वाचा : व्हायरल व्हिडीओ : माहुतांकडून आजारी हत्तीला क्रूरपणे मारहाण!
रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लहुलसे गावातील रिंगे यांच्या सात खोल्यांचे लाकडाने बनवलेले घर आहे. या घराला लाईटच्या मीटरला शॉर्ट सर्किटने आग लागली. घरात लाकडी काम जास्त असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. यामध्ये संपूर्ण सात खोल्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरात कोंडीराम हरी रिगे, हरी भीकू रिंगे, पांडु शंकर रिंगे, वर्षा दीपक रिंगे, शंकर सीताराम रिंगे, संतोष सीताराम रिंगे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी तात्काळ नदीवरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना दाभिळ व करंजे आदिवासी वाडी येथील ग्रामस्थांनी देखील मदतीचा हात दिला.
या घटनेचे वृत्त समजताच महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी तत्काळ रवाना केली. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, माजी सरपंच प्रकाश कदम, अनिल दळवी, उपसरपंच शंकर केसरकर, तलाठी बनसोडे, किसन रींगे, बाबूराव दळवी अग्निशामक दल, पोलादपूर पोलिस ठाण्यातील अधिकारी आशिष नटे, इकबाल शेख घटनास्थळी पोहचले.
अधिक वाचा : बीगबाॅस १४ व्या पर्वाची अंतिम विजेती ठरली रुबिना दिलैक
या आगीमध्ये घरातील सर्व साहित्यासह लाकडी खांब, अन्नसाठा, जीवनावश्यक वस्तू, शेतीची अवजारे, वस्त्र व किमती साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या पूर्वी लहुलसे गावात 7 जानेवारी 2021 रोजी रात्री वादळी पावसात घरा शेजारील विद्युत खांबावर वीज कोसळली होती. यामध्ये चार घरांना आग लागली होती. या आगीत चार घराचे सुमारे 5 लाख 66 हजार 100 रुपयांचे नुकसान झाले होते. या वेळी शिवराम रिंगे यांच्यासह दिनकर रिंगे, पंकज रिंगे, पांडुरंग रिंगे यांच्या घराचे नुकसान झाले होते. या नंतर पुन्हा दीड महिन्या नंतर आग लागल्याने तालुक्यात अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी केली आहे.