पुणे : मेट्रो मार्गाच्या सुरू असलेल्या कामासह न्यायालयातील नव्या इमारतीच्या बांधकामामुळे जिल्हा न्यायालयातील पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वकील, पक्षकारांना दुचाकी पार्किंगसाठी जागा शोधताना वणवण करावी लागत आहे. काही जण रस्त्यावर वाहने लावत असल्याने 'संचेती'कडून पुणे स्टेशनकडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. मागील काही दिवसांपासून चार नंबरच्या प्रवेशद्वारालगत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संचेती चौक) पासून कामगार पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने न्यायालयातील पार्किंगची जागा कमी झाली आहे. न्यायालायात न्यायाधीश, पोलिस, न्यायालयीन कर्मचारी यांसह बहुतांश वकिलांना पार्किंगसाठी जागा मिळते.
किंबहुना त्यांच्या जागा आरक्षित केल्या आहेत; परंतु न्यायव्यवस्थेत सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या पक्षकाराला तो न्यायालयात आल्यानंतर वाहन उभे करण्यासाठी जागा शोधत फिरावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पर्यायाने पक्षकारांना न्यायालयाबाहेरील रस्त्यावर वाहन उभे करावे लागते. मात्र, वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरही वाहने उभे करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. परिणामी, न्यायालयात येणार्यांना वाहने लांब लावून पायपीट करत न्यायालयात यावे लागत असल्याचे अॅड. अर्जुन वाघमारे यांनी सांगितले.
पोलिसांच्या जीप व व्हॅनमुळे आवारात चालणे मुश्किल
आरोपींना मोठ्या व्हॅनमधून न्यायालयात आणले जाते. याखेरीज, पोलिसांच्या जीपही न्यायालयात येत असतात. आरोपींसाठी असलेल्या कक्षात त्यांना पाठविल्यानंतर अथवा आरोपींना कोर्ट रूममध्ये नेल्यानंतरही ही वाहने आहे त्या ठिकाणी थांबतात. पूर्वी नव्या इमारतीच्या समोरील पटांगणात वाहने उभी करण्यासह मज्जाव करण्यात आला होता. मात्र, सद्य:स्थितीत या ठिकाणी पोलिसांच्या जीप व मोठ्या व्हॅनही थांबत असल्यामुळे येथून मार्ग काढणे गैरसोयीचे ठरत आहे.
बोस चौक ते कामगार पुतळा रस्त्यावर वाहनांचीच गर्दी
न्यायालय परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापासून (संचेती चौक) कामगार पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे मार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे जवळपास निम्मा रस्ता बंद आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांकडून दोन्ही बाजूने वाहनांचे पार्किंग होत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे, या रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
मेट्रो स्टेशनलगतचे पर्यायी पार्किंगही बंद
पार्किंगच्या समस्येवर पुणे बार असोसिएशनमार्फत सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनलगतच्या मोकळ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी, जागेवरील सर्व राडारोडा हटवत सपाटीकरण करण्यात आले. मात्र, मेट्रोमार्फत या जागेचा बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी वापर सुरू झाल्याने सध्या येथील पार्किंग व्यवस्थाही बंद पडल्याचे चित्र आहे.
न्यायालयात येणार्यांसाठी पुरेसे पार्किंग असणे आवश्यक आहे. पार्किंगअभावी न्यायालयासह परिसरातही वाहतूक कोंडी होत आहे. पार्किंगची व्यवस्था केल्यास न्यायालय आवारासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. वाहनाच्या वर्दळीमुळे धुळीच्या त्रासाचाही मोठा सामना करावा लागत आहे.
– अॅड. धैर्यशील पाटील,
फौजदारी वकील.
न्यायालयातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊनही प्रशासनामार्फत दखल घेतली जात नाही. विकासाची कामे होत असली तरी पायाभूत सुविधाही पुरविण्याकडे लक्ष हवे. भविष्याचे आश्वासन दाखवून सध्या आहे त्याच परिस्थितीत दिवस काढायला लावणे ही प्रशासनाची भूमिका स्वीकारार्ह नाही. पुणे बार असोसिएशनही या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही.
– अॅड. राशीद सिद्दिकी,
फौजदारी वकील.
हेही वाचा
कोल्हापूर : आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांचा मोर्चा
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.