Uncategorized

नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान, राज ठाकरे यांची सभा घेण्यासाठी महायुतीकडून नियोजन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील मैदानात उतरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज यांची तोफ कनकवली येथे धडाडली. त्यामुळे नाशिकमध्येही राज ठाकरे यांची व्हावी यासाठी महायुतीच्या उमेदवाराकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात मनसेचे देखील एक गठ्ठा मतदान असल्याने, ते मिळविण्याचा महायुतीच्या उमेदवारांचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील पाचपैकी दोन टप्प्यांचे मतदान पार पडले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी आहे. तत्पूर्वी राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरल्याने निवडणुकीची रंगत वाढत आहे. शनिवारी (दि.४) त्यांनी कणकवली येथे सभा घेतली. या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान असल्याने अन् राज यांची या निवडणूकीतील पहिलीच सभा असल्याने संबंध राज्याचे लक्ष या सभेकडे लागून होते. या सभेनंतर राज १२ मे रोजी कल्याण येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान असल्याने, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राज यांची नाशिकमध्ये सभा घेण्यासाठी महायुतीकडून नियोजन केले जात आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महायुतीच्या उमेदवारासाठी नाशिक जिल्ह्यात सभा घेणार असल्याने, पुढील काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडवून दिला जाण्याची शक्यता आहे.

महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज यांनी पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांच्या रॅलीत मनसेचे जवळपास सर्वच स्थानिक पदाधिकारी हजर होते. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून नेमलेले अभिजीत पानसे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघात अर्ज भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवाराची घोषणा केल्याने, कमी दिवसात मतदारसंघ पिंजून काढण्याचे आवाहन महायुतीच्या उमेदवारासमोर आहे. अशात राज ठाकरे यांची सभा झाल्यास, त्याचा मोठा लाभ महायुतीच्या उमेदवाराला होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

नाशिक मनसेचा बालेकिल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकने जेवढे वैभव दिले, तेवढे वैभव कोणत्याच जिल्ह्यात मनसेला मिळाले नाही. महापालिकेच्या मनसेच्या हातात चाव्या देतानाच, नाशिककरांनी मनसेचे तीन आमदार निवडून दिले. नंतरच्या काळात मनसेला हे वैभव टिकवून ठेवता आले नसले तरी, मनसेची विचारधारा मानणारा मतदार नाशिक जिल्ह्यात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राज ठाकरे यांची सभा झाल्यास, मनसेचे एक गठ्ठा मतदान महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

असाही योगायोग
२००९ च्या लोकसभा निवडणूकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या हेमंत गोडसे यांनी त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेवून मनसेची ताकद दाखवून दिली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारात मैदान गाजविले होते. मात्र त्यानंतर ते शिवसेनेत गेले अन् २०१४ अन् २०१९ मध्ये सलग दोन टर्म खासदार झाले. आता ते महायुतीचा उमेदवार असल्याने, राज ठाकरे पुन्हा एकदा गोडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार काय? याची नाशिककरांना उत्सुकता लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT