Uncategorized

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह गायब

Pudhari News

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या झपाट्याने वाढल्याने शवविच्छेदगृहात मृतदेह ठेवण्यात जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची मृतदेह शोधण्यात धावापळ होत असताना एका तरुणाचा मृतदेह गायब असल्याचा प्रकार पुढे आला. या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : अमरावती क्राईम : २० वर्षीय तरुणाची हत्या

नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे (वय २५) या तरुणास पोटदुखीच्या त्रासामुळे मंगळवारी सकाळी नऊ वाजता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रारंभी त्याला फिवर ओपीडीमध्ये दाखल केले गेले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तेथून कॅजुल्टी विभागात हलविण्यात आले. तरुणाला तेथे दाखल करून त्याचे काही नातेवाईक गावी निघून गेले तर त्याची आई आणि भाऊ त्याच्यासोबत थांबले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले.

त्यामुळे गावी गेलेले नातेवाईक यवतमाळात परत येवून त्यांनी रात्री अकरा वाजता रोशनचा मृतदेह बघून खातरजमा केली. रुग्णालय प्रशासनाने आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येत असून तो बुधवारी ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे नातेवाईक बुधवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता शवविच्छेदन गृहात रोशनचा मृतदेह आढळला नाही. दिवसभर नातेवाईकांनी रुग्णालयात जिथे जिथे मृतदेह ठेवले होते तो सर्व भाग पिंजून काढला मात्र, मृतदेह मिळाला नाही. 

अधिक वाचा : शालूचा स्वत:च्या 'वावरात' साडीमध्ये जलवा!

यावर आता शवविच्छेदगृहातील कर्मचारी काहीही सांगण्यास तयार नाही. 'आमच्याकडे मृतदेह आलाच नाही, त्यामुळे तुम्ही वरिष्ठांना विचारा' असे सांगून नातेवाईकांना परतवून लावले जात आहे. अशी माहिती मृताचे नातेवाईक प्रफुल मनोहरे यांनी दिली. वृत्त लिहीपर्यंत रोशनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेला नव्हता याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वाट पाहण्याचा सल्ला देऊन गावी परत पाठविण्याची माहिती एका नातेवाइकांनी दिली. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना विचारणा केली असता सदर रुग्णाचा मृतदेह वार्डात होता. तो सायंकाळी शवविच्छेदनगृहात शिफ्ट करण्यात आला अशी माहिती दिली.

SCROLL FOR NEXT