परभणी : पुढारी वृत्तसेवा
2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात परतलेली मुकबधीर गीता आपल्या कुटूंबियांच्या शोधासाठी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बालपणीच्या आठवणींच्या आधारे तीने मराठवाड्यात परभणी जिल्हा आज (सोमवार) गाठला. आपल्या जन्मगावालगत रेल्वेमार्ग, त्या लगत असलेली नदी, ऊसशेती, भुईमूग आदी बालपणींच्या आठवणींच्या आधारे ती पुर्णा व गंगाखेड या गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये कुटूंबियांचा शोध येत्या तीन दिवसांत घेणार आहे. 31 डिसेंबरला परतल्या नंतर पुन्हा 3 महिन्यांसाठी ती परभणीतील पहल फाऊंडेशन या संस्थेत (दि. 7) जानेवारीत दाखल होणार आहे. त्या दरम्यानही तिचा कुटूंब शोध सुरूच राहणार आहे.
वयाच्या 8 व्या वर्षी अनाहूतपणे मुकबधीर असलेली गीता पाकिस्तानात गेली होती. 2015 मध्ये तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने ती भारतात दाखल झाली. आजमितीस ती (27) वर्षांची आहे. भारतात आल्यानंतर विविध संस्थांमध्ये दाखल झाल्यानंतर तीचा कुटूंबशोध सुरू झाला होता. 6 महिन्यांपुर्वी ती इंदुरच्या (मध्यप्रदेश) आनंद सर्व्हीस सोसायटी या सेवाभावी संस्थेत वास्तव्यास आली. या संस्थेचे ज्ञानेंद्र पुरोहीत यांनी संस्थेमार्फत पालन पोषण करण्याबरोबरच तिच्या कुटूंबियांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
गीताने लहानपणाच्या केलेल्या वर्णनानूसार पुरोहीत यांनी तिच्या कुटूंबियांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्राकडे मार्गक्रमण केले. पहिल्या मोहिमेतून अपेक्षा वाढल्याने आता दुसर्या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये ही शोधमोहिम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ज्ञानेंद्र पुरोहीत व इंदुर रेल्वे पोलिसची महिला कर्मचारी सायना बाघेल हे दोघे सोमवारी दुपारी सचखंड एक्सप्रेस रेल्वेने परभणीत दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे शोधमोहिमेसाठी मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लासूर स्टेशनमध्ये साधर्म्य वाटले पण…
11 ते 19 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात सुरू केलेल्या पहिल्या शोधमोहिमेत ज्ञानेंद्र पुरोहीत व गिता यांनी औरंगाबाद, लासुर स्टेशन, जालना, नांदेड, बासर, नाशिक, परभणी येथे कुटूंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात गीताच्या आठवणींनूसार लासूर स्टेशन गावाजवळ तिला आपले गाव असल्याच भास झाला होता. मात्र तिच्या आठवणीनूसार रेल्वेस्थानक व त्याजवळ असलेली नदी या बाबी लासूरमध्ये नसल्याने या गावाबाबत तिने नकार दर्शविला.
देवनागरी लिपी व राहणीमानामुळे परभणी – ज्ञानेंद्र पुरोहीत
पाकिस्तानात असताना गीता ही देवनागरी लिपीमध्ये आकडेमोड करत असे. त्याचबरोबर तिच्या राहणीमानाची पध्दत, संस्कृती यावरून ती महाराष्ट्रातीलच असावी, असा अंदाज घेवून तिच्या कुटूंबियांचा शोध सुरू केला आहे. मागील 5 महिन्यांपासून संस्था तिच्या पालन पोषणाबरोबरच तिला स्वयंपुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यातुनच परभणीतील पहल फाऊंडेशनचे अनिकेत सेलगावकर यांच्याकडे तिला पुढील 3 महिने ठेवून मुकबधिरांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तीन दिवसाच्या शोधानंतर पुन्हा इंदूरला जावून ती 7 जानेवारीला परभणीत दाखल होईल. या तीन महिन्यांच्या दरम्यान तिच्या कुटूंबियांची शोध मोहिम सुरूच राहणार आहे. तिच्या कुटूंबामध्ये आई वडिलांसह 3 भाऊ व 2 बहिणी आहेत, अशी माहिती ज्ञानेंद्र पुरोहित यांनी पुढारीशी बोलताना दिली.