कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या सातव्य दिवशी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये काही आशा व गटप्रवर्तक दुर्गाच्या वेशात सहभागी झाल्या होत्या. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दि. 15 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आशा व गटप्रवर्तक युनियनने घेतला होता. मोर्चाची सुरुवात रेल्वेस्थानकापासून होणार होती. त्यासाठी या ठिकाणी जमण्याचे आवाहनही युनियनच्या वतीने करण्यात आले होते. परंतु, मोर्चा काढल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला. त्यामुळे गटागटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येण्याचे ठरले. सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होत्या. त्यामुळे त्याला मोर्चाचे स्वरूप आले होते. सर्वांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. तसेच काही आशा व गटप्रवर्तकांनी दुर्गाचा वेश केला होता. कोरोना विषाणूची प्रतिकृतीही मोर्चामध्ये आणण्यात आली होती. डोळ्यांवर काळी पट्टी बांधून हातामध्ये तराजू घेऊन आशा सहभागी झाल्या होत्या.
'काम जास्त, मानधन कमी, शासकीय कर्मचारी दर्जाही नाही, वेतन व दर्जा घेतल्याशिवाय थांबणार नाही', 'अविरत काम करणारी आशा मानधनावर, बाकी सगळे पगारावर', 'आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे', 'कोरोना महामारीशी लढणार्या आशांची किंमत 33 रुपये', 'अस्तित्वाची लढाई लढण्या सरसावल्या रणरागिणी,' असे फलक आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी हातामध्ये धरले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'एक रुपयाचा कडिपत्ता, सरकार झाले बेपत्ता', 'कांदा म्हणतो बटाट्याला, लाज नाही सरकारला', 'वा रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू, महँगा तेल', 'लय लय लय अत्याचार, लय लय लय भ—ष्टाचार', 'वेतन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' आदी घोषणांमुळे हा परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, आशा व गटप्रवर्तकांना सरकार सापत्नपणाची वागणूक देत आहे. आशांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. त्यामुळे नाइलाजास्तव हा संप पुकारावा लागत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच राहील. अतुल दिघे यांनी या संपाला सर्व कामगार संघटना पाठिंबा देतील, असे सांगितले. बाबा नदाफ, सुवर्णा तळेकर यांचीही भाषणे झाली.
यानंतर एका शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात युनियनच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील, शहर अध्यक्ष ज्योती तावरे, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, योगीता पाटील, राजश्री देसाई, लता सासणे, माया पाटील, वसुधा बुडके, मनीषा पाटील, अनिता अनुसे, सुप्रिया गुदले, सारिका पाटील, शर्मिला काशीद, विमल अतिग्रे, प्रतिभा इंदुलकर आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रमुख मागण्या…
अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा कामावर दोन दिवस बहिष्कार
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आता अंगणवाडी सेविका व मदतनिसांनीही मंगळवार (दि. 22) पासून दोन दिवस कोरोनासंबंधीची कामे न करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी होणार असल्याचे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष उतल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी आशांच्या संपाला आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आप्पा पाटील यांनी यापूर्वीच आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
यावेळी तळेकर म्हणाल्या, आशा व गटप्रवर्तकांच्या संपात फूट पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा अंगणवाडी महिला कर्मचार्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आशा, गटप्रवर्तक या आमच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्यांच्या संपात फूट पडावी, असे कोणतेही काम अंगणवाडी कर्मचार्यांच्या संघटनेकडून होणार नाही. आशांच्या संपाला पाठिंबा देण्याकरिता मंगळवार (दि. 22) पासून दोन दिवस कोरोनाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील नऊ ते साडेनऊ हजार अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी होतील.