Uncategorized

प्रजा समाजवादी पक्षातील दुही काँग्रेसच्या पथ्यावर

Pudhari News

रत्नागिरी ः प्रतिनिधी

मागील विधानसभा निवडणुकांत छाप पाडणार्‍या प्रजा समाजवादी पक्षाची सन 1972च्या निवडणुकीत वाताहात झाली. या पक्षात दोन गट तयार होऊन संयुक्‍त समाजवादी पक्षाची स्थापना झाली. या दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली. पण दोघांच्याही पदरी निराशाच आली. याचा फायदा काँग्रेस पक्षाला थेट झाला. तेरा मतदार संघांपैकी केवळ गुहागर वगळता उर्वरीत सर्वत्र काँग्रेसचा झेंडा दिमाखात फडकला. गुहागरमध्ये मात्र डॉ. श्रीधर नातू यांनी एकहाती विजय मिळवला.

सावंतवाडी मतदारसंघ : सन 1972च्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार बदलला. गतवेळी वेंगुर्ला मतदार संघातून निवडून आलेले प्रतापराव देवराम भोसले हे काँग्रेसमधून रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात संयुक्‍त समाजवादी पक्षाने जयानंद मटकर यांना तिकीट दिले होते. सन 1968च्या निवडणुकीत मटकर प्रजा समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले होते. भारतीय जनसंघाकडून गणपत सिताराम काळसेकर पुन्हा रिंगणात उतरले. गतवेळी शेकापकडून निवडणूक लढवणारे के. आर. देसाई यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरले. उमेदवार बदलूनही काँग्रेसला येथे मोठा विजय मिळाला. काँग्रेसच्या भोसले यांना 27,647, मटकर यांना 10,747, जनसंघाच्या काळसेकर यांना 5,294 आणि सावंत यांना अवघी 428 मते पडली.

वेंगुर्ला मतदारसंघ : प्रजासमाजवादी पक्षामध्ये फूट पडल्याने येथून संयुक्‍त समाजवादी पक्षाने कुंडलिक किन्हळेकर यांना रिंगणात उतरवले होते. येथून काँग्रेसने सीताराम नारायण देसाई यांना संधी दिली. नॅशनल सिंडीकेट काँग्रेसकडून गुणवंत आत्माराम तोडणकर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून बाबूराव जाधव,अपक्ष म्हणून अंकूश पाटकर रिंगणात होते. प्रजा समाजवादी पक्षातील पडलेली फूट काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडली. सीताराम देसाई 28,655 मतांनी विजयी झाले. किन्हळेकर यांना अवघी 11,356 मते पडली. तोडणकर यांना 3,314, जाधव यांना 1,195 आणि पाटकर यांना 1,073 मते पडली.

कणकवली मतदारसंघ :  गतवेळच्या निवडणुकीत येथे शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली होती. त्यामुळे शेकापचे आमदार सीताराम सखाराम सावंत यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा होत्या. या मतदार संघात काँग्रेसने के. व्यंकटेशराव राणे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रीय सिंडीकेट काँग्रेसकडून हरि बाबूराव आगलावे यांनी रिंगणात उडी घेतली होती. खरी लढत राणे आणि सावंत यांच्यामध्ये होऊन काँग्रेसने शेकापकडून ही जागा बळकावली. राणे यांना 28,268 मते पडली. तर सावंत यांना 13,376 मते मिळाली. आगलावे केवळ 918 मतेच मिळवू शकले.

मालवण मतदारसंघ : गतवेळचे आमदार विजयसिंह प्रभूगावकर यांनाच काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली. गतवेळी प्रजा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणारे शाम कोचरेकर संयुक्‍त समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले होते.  पक्षाने दर्शवलेला विश्‍वास र्सा ठरवत प्रभुगावकर यांनी 23,386 मते मिळवत विजय मिळवला. कोचरेकर यांना 13,166 मते पडली. त्याशिवाय जनसंघाकडून उतरलेले विठ्ठल नारायण मालवणकर यांना 958 मते, अपक्ष उमेदवार पांडुरंग चव्हाण यांना 1,051 मते पडली.

देवगड मतदारसंघ : या मतदार संघात गतवेळच्या निवडणुकीत विजयी झालेले प्रजा समाजवादी पक्षाचे रामकृष्ण  मुंज यावेळी संयुक्‍त समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले होते. मात्र ते तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी 5,412 मते पडली. गतवेळचे पराभूत उमेदवार काँग्रेसचे राजाभाऊ गोविंद मिराशी यावेळी मात्र नशिबवान ठरले. त्यांनी 26,918 मते घेत विजय मिळवला. भारतीय जनसंघाच्या वसंत सदाशिव नाईकसाटम आणि अपक्ष उमेदवार रामकृष्ण तावडे पराभूत झाले.

राजापूर मतदारसंघ :  या मतदार संघात मोठे व्यक्‍तीमत्व असलेले ल.र.तथा भाई हातणकर यांना प्रजा समाजवादी पक्षात पडलेली फूट नुकसानदायक ठरली. काँग्रेसचे सहदेव मुकुंद ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला. ठाकरे यांना 22,006 मते पडली तर हातणकर यांना 19,761 मते पडली. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सदानंद शिवराम चव्हाण यांना 770 मते पडली.

लांजा मतदारसंघ : गतवेळचे विजते शशीशेखर आठल्ये गुरुजी यांनी यावेळी निवडणूक लढण्यास प्रजा समाजवादी पक्षाला नकार दिला होता. त्यामुळे प्रजासमाजवादी पक्षाने यावेळी जगन्‍नाथराव जाधव यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शिवाजीराव सावंत उभे होते. सिंडीकेट काँग्रेसकडून नाना वंजारे तर अपक्ष म्हणून गोपाळ काशीनाथ सुर्वे रिंगणात होते. आठल्ये गुरुजींनी घेतलेली माघार आणि प्रजा समाजवादी पक्षातील दुहीचा फायदा काँग्रेसला झाला. शिवाजीराव सावंत 21,939 मते घेऊन विजयी झाले. प्रजा समाजवादीच्या जाधव यांना अवघी 11,308मते पडली. सिंडीकेट काँग्रेसच्या नाना वंजारे यांना 2,376, अपक्ष गोपाळ सुर्वे यांना 734 मते पडली.

रत्नागिरी  मतदारसंघ : या मतदार संघात काँग्रेसने प्रथमच मुस्लीम समाजाच्या व्यक्‍तीला उमेदवारी दिली. पक्षाने एस. ई. हसनैन यांनी अर्ज भरला होता. जनसंघाकडून पुन्हा विठ्ठल कृष्णाजी निवेंडकर, रिपब्लिकन पार्टीकडून ग. भि. कांबळे, अपक्ष म्हणून एन. टी. भाटकर रिंगणात होते. काँग्रेसच्या शामराव पेजे यांच्या कार्यकर्तुत्वाने पुन्हा काँग्रेसलाच साथ देत हसनैन यांना विजयी केले. त्यांना 22,325 मते पडली.  निवेंडकर यांना 13,395, भाटकर यांना 4,953, कांबळे यांना 1,983 मते पडली.

संगमेश्‍वर मतदारसंघ : कोकणात पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवणार्‍या लक्ष्मीबाई उर्फ मामी भुवड यांना सन 1972ची निवडणूक सहज सोपी गेली. 21,952 मते घेत त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात भारतीय जनसंघाने पुन्हा एस. डी. भिडे यांना रिंगणात उतरवले होते. प्रजासमाजवादी पक्षाने यावेळी मनोहर अणेराव यांना उमेदवारी दिली. महंमद दाऊद शेखासन हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. भिडे यांना 9,186, अणेराव 7,803 तर शेखासन यांना 1,364 मते पडली.

चिपळूण मतदारसंघ : सलग तिसर्‍यांदा बाळासाहेब सावंत यांनी विजय होत या मतदार संघात हॅटट्रिक नोंदवली. जनसंघाने पुन्हा राजाराम गंगाराम घाग यांना उमेदवारी दिली होती. मात्र बाळासाहेब सावंत यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय मिळवला. त्यांना 34,379 मते तर घाग यांना 5,767 मते पडली.

गुहागर मतदारसंघ : या मतदार संघात काँग्रेसने आपला उमेदवार बदलला. यावेळी रामचंद्र बेंडल यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसप्रमाणे जनसंघानेही आपला उमेदवार बदलत प्रेमजीभाई असर यांच्याऐवजी डॉ. श्रीधर नातू यांना रिंगणात उतरवले. गणेश बाबाजी पोवार व शांताराम सोलकर यांनी अपक्ष म्हणून लढत दिली. उमेदवार बदलाचा हा प्रयोग काँग्रेससाठी अपयशी तर जनसंघासाठी लाभदायक ठरला. डॉ. श्रीधर नातू हे 22,145 मते मिळवत विजयी झाले. काँग्रेसच्या बेंडल यांना 19,866 मते पडली. पोवार व सोलकर यांना अनुक्रमे 3,054 आणि 852 मते पडली.

खेड मतदारसंघ : या मतदार संघातून काँग्रेसने हुसेन मिश्रीखान दलवाई यांना सलग तिसर्‍यांदा उमेदवारी दिली. जनसंघाकडून यावेळी माधव रामजी पालांडे यांना तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून स. वि. जोगळेकर आणि अपक्ष म्हणून भाई भोसले रिंगणात उतरले होते. हुसेन दलवाई यांनी तब्बल 30,081 मते घेत एकतर्फी विजय मिळवला. पालांडे यांना 5,196 मते पडली. जोगळेकर यांना 3,862 मते पडली तर अपक्ष भोसले यांना 4,791 मते पडली.

दापोली मतदारसंघ : या मतदार संघातही काँग्रेसला अन्य कोणत्याही पक्षांकडून आव्हान मिळाले नाही. काँग्रेसच्या रामचंद्र बेलोसे यांच्या विरोधात केवळ गंगाराम दौलत सकपाळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. अपेक्षेप्रमाणे येथे बेलोसे यांचा विजय झाला. अपक्ष सकपाळ यांनी त्यांना जोरदार टक्‍कर दिली. सकपाळ यांना 25,537 मते पडली तर बेलोसे यांनी 30 हजारी मते गाठल्याने ते पाच हजार मतांनी विजयी झाले. प्रजा समाजवादी पक्षाती दुफळी काँग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडल्याचे चित्र त्यावेळी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT