मुंबई : पुढारी वृत्तसेवा
चेकपोस्ट, विलिगीकरण, कोरोना पेशंट चे सर्व्हेक्षण ही कामे कमी झाली की काय ? शिक्षकांना आता चक्क धरण फुटीकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षकांची ही कामे रद्द करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली आहे
उपविभागीय अधिकारी, दापोली यांनी समक्ष दिलेल्या तोंडी सूचनेप्रमाणे तालुक्यातील पणदेरी गावातील धरणाची गळती सुरु झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला कळवण्यासाठी या ठिकाणी शिक्षकांच्या नेमणूक करण्यात आली आहे. तसेच तरी नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून धरणाचे सद्यस्थितीचे अहवाल देण्याचे फर्मान मंडणगड आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांनी दिले आहे.
हे कामकाज करताना कोविड 19 बाबतचे सर्व नियम पाळून कामकाज करणेत यावे. आदेश प्राप्त होताच त्वरित कामकाजास सुरवात करावी. याबाबत कसूर करणारे कर्मचारी/अधिकारी यांचेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30, 33, 34, 41 व 51 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43, 53 अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, ही कामे तातडीने बंद करावीत, अन्यथा भाजपा शिक्षक आघाडी आक्रमक होत आंदोलन करेल असा इशारा अनिल बोरनारे यांनी दिला आहे.