बाळासाहेब पाटील : पुढारी ऑनलाईन
स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची सर्वदूर ओळख आहे. रायगडासारखा विस्तीर्ण, सपाट गड राजधानी म्हणून शोभतो. त्याचवेळी स्वराज्यात राजगडाचे महत्त्वही अनन्य साधारण आहे. सध्या राजगडावरील प्रस्तावित रोपवेला शिवप्रेमींमधून विरोध होत आहे. त्यामुळे रायगड सध्या चर्चेत आहे. या गडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यस्वप्न साकारले. या गडाने अनेक डावपेच, थरार आणि रोमांचक अनुभवही घेतले. या गडाचे आणि छत्रपती शिवरायांचे अतूट नाते होते. तब्बल २३ वर्षे छत्रपतींचे वास्तव्य या गडावर होते. सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला हा गड वैशिष्ट्यपूर्ण आणि बेलाग आहे. तर जाणून घेऊ या हा गड नेमका आहे तरी कसा आणि शिवरायांनी पुरंदरावरून या गडावर आपला राज्यकारभार का हलविला.
१. स्वराज्य उभारणीचा साक्षीदार असलेली प्रथम राजधानी
रायगड हा स्वराज्याचा मुकुटमणी असला तरी राजगड हा कोंदण आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेला आणि आपल्या दुर्गमतेनं छातीचा बुरुज करून कातळावर उभा असलेला हा गड छत्रपतींचे सर्वाधिक सानिध्य लाभलेला गड आहे. या गडावर १६५७ ते १६७० पर्यंतचे छत्रपतींचे आयुष्य येथे गेले. या गडाच्या बांधणीबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, स्वराज्यातील गडकोटांचे बांधकाम सुरू झाले ते तोरणा गडापासून. या गडावर धन सापडल्याचे काही संदर्भ मिळतात. तोरणा गडाच्या समोर मुरुमदेवाचा डोंगर होता. या डोंगरावर लहानसे ठाणे असावे, तोरण्यावरील धनाचा वापर राजगडाच्या बांधकामासाठी करण्यात आला. १६५७ पर्यंत महाराज पुरंदरावर होते. निजामशहाचे ताबेदार शिमळीकर यांच्याकडून हा गड शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त काळ ज्या गडाच्या बांधणीला लागला ताे गड म्हणजे राजगड, असे मत काही इतिहासकारांनी नाेंदवले आहे.
२. परकीयांनीही केले दुर्गमतेचे कौतुक
या गडाचे वर्णन करताना महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही' नामक ग्रंथामध्ये म्हणतो, 'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपते. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्र पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर बारा कोसांचा. त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते. याच कारणांसाठी शिवरायांनी पुरंदरावरून आपला राजपरिवार राजगडावर हलविला. राजगड इतका दुर्गम आहे की, ज्या बालेकिल्ल्यावर छत्रपतींचा वाडा होता तेथे आजही चालत जाणे मुश्किल आहे. तीन माच्यांनी सजलेला हा गड प्रचंड दुर्गम आहे. सुरतेची लूट, अफजल खानाचा वध, पन्हाळगडावरुन सुटका, शाहिस्तेखानावर हल्ला यासह अनेक लढायांचा, घडामोडींचा हा गड साक्षीदार आहे. जावळीच्या मोऱ्यांवर ज्यावेळी महाराजांनी हल्ला केला त्यानंतर मोरे रायगडावर पळून गेले. त्यांचा शोध घेताना रायगडाची भव्यता महाराजांनी हेरली आणि तीच स्वराज्याची पुढे राजधानी झाली. अत्यंत धामधुमीच्या काळात राजगडाचे महत्त्व छत्रपतींनी ओळखले आणि हा गड स्वराज्याची पहिली राजधानी झाला.
३. संजीवनी माची ही दुर्गस्थापत्याची अद्भूत नमुना
राजगडावर तीन माच्या आहेत. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशा तीन माच्या राजगडाची शान आहे. यातील संजीवनी माची ही दुर्गस्थापत्यातील उत्तम आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. या माचीचे बांधकाम चिलखती म्हणजे दुहेरी आहे. या तीन माचीच्या कोंदणात बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत दुर्गम अशी वाट आहे. बालेकिल्ल्यावर दुर्गम अशी वाट असून तेथील वाड्यात शिवाजी महाराज राहत होते.
४. बेलाग बालेकिल्ला
पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाजवळ असलेला हा गड समुद्रसपाटीपासून १३७६ मीटर उंचीवर आहे. गडावर पायवाट असून येथे गुप्तवाटाही होत्या. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या आणि एक बालेकिल्ला आहे. बालेकिल्याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. यावर येण्यास गुंजपा, पाली, आळू व काळेश्वरी असे चार दरवाजे व तीन दिंड्या आहेत. पद्मावती माची पुष्कळ लांब-रूंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. तथापि सुवेळा व संजीवनी ह्या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ला यांवरही वस्ती होती. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर रहात असत. बालेकिल्ला उंच आणि बेलाग आहे. आजही बालेकिल्ल्यावर जाताना हाताचा आधार घ्यावा लागताे.
५. पायथ्याला वसवले शहर, गडावर बाजारपेठ
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणूनच राजगडाची बांधणी केल्याचे आपल्या लक्षात येते ते गडाची आणि पायथ्याजवळच्या गावांची पाहणी केल्यानंतर. रायगडावरील वैशिष्टपूर्ण बांधणीची बाजारपेठ लक्ष वेधून घेते. अशीच एक बाजारपेठ राजगडावर आहे. या बाजारपेठेच्या धर्तीवर मोठी बाजारपेठ रायगडावर बांधण्यात आली. तसेच गडाच्या पायथ्याला शिवापट्टण हे शहर वसविले.
६. दुर्गम तरीही पाण्याची मुबलक सुविधा
राजगड दुर्गम असला तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आकाराला आला होता. त्यामुळे येथे पाण्याचे नियोजन उत्तम केले होते. गडावर अनेक इमारती होत्या. तीनही माच्या वैशिष्टपूर्ण होत्या. तीन माच्या आणि बालेकिल्ल्यावर गणेश, मारूती, ब्रम्हर्षी, जननी काळेश्वरी, भागीरथी यांची लहानमोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा या इमारतींचे अवशेष आजही दिसतात. तीनही माच्या आणि बालेकिल्ल्यावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पद्मावती माचीवरील तळे मोठे असून गडाला येथून पाणीपुरवठा होत असे. पद्मावती तलाव हा गडावरील महत्त्वाचा तलावर गडावर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब या तलावास साठवला जाईल, अशी व्यवस्था होती. वाहून जाणाऱ्या ओहोळ आणि नाले खोदून तोंडाशी बांध घातले होते. याच धर्तीवर रायगडावर गंगासागर, हत्तीतलाव आदी निर्माण केली गेली.
७. वैशिष्ट्यपूर्ण वाटा
या गडाची बांधणी करत असताना पाली दरवाजाचीही बांधणी केली. रायगडाचा महादरवाजा गोमुखी मानला जातो. जोवर या दरवाजाजवळ जात नाही तोवर तो दिसत नाही. पाली दरवाजाही अनेक वैशिष्ट्यांनी बनलेला आहे. गडावर हल्ला झाल्यास या वाटेने येणारा शत्रू बिनीचा दरवाजा, मागे असलेला बालेकिल्ला आणि उजव्या बाजुच्या महाद्वाराच्या तटबंदीतील जागेतून माऱ्यापुढे टिकणार नाही, असा हा दरवाजा होता. येथून बंदुका, तिरंदाजी, गोफण अशा शस्त्रांचा मारा करता यावा, अशी रचना करण्यात आली होती.
८. शौचालये
रायगडावर जेथे पहारा तेथे पाणी,अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गडावर असलेली शौचालय व्यवस्था वैशिष्टपूर्ण होती. तत्पुर्वी राजगडावरही ही व्यवस्था करण्यात आली होती. राजगडाच्या पहाऱ्यावर असलेल्या शिबंदीच्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्याची दुर्गंधी येऊ नये, अशीही व्यवस्था होती.
९. चोरदरवाजा
रायगडावर वाघदरवा हा गुप्त दरवाजा आहे. तशीच एक वाट राजगडावरीह आहे. दुर्गवास्तूशास्त्राचा हा आश्चर्यकारक नमुना आहे. शत्रूने हल्ला केल्यास राजपरिवार आणि मावळे सुरक्षित बाहेर जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. राजगडावर तिनही माच्यांवर चोरदिंड्या आहेत. तसेच पिछाडीचा आणि खासगी असे दोन चोरदरवाजे आहेत. हे दरवाजे शत्रूची दिशाभूल करणारे आहेत.