कोल्हापूर : संग्राम घुणके
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असणार्या नाचणी या तृणधान्याचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क (कोल्हापूर) येथील संशोधक डॉ. सुनील कराड यांनी संशोधनाद्वारे नवीन वाण विकसित केले असून 'फुले कासारी' असे त्याला नाव देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे वाण उत्पन्नात वाढ देणारा असून खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामांत घेता येतो.
यापूर्वी डॉ. कराड यांनी नाचणीचे 'फुले नाचणी' या नावाने एक वाण तसेच बर्टीचे एक नवीन वाण संशोधन करून विकसित केले आहे. 'फुले कासारी'साठी 2010 मध्ये विविध भागातून नाचणीचे जुने वाण जमा (जनुकीय संग्रह) केले गेले. त्याची लागवड केल्यानंतर 2011 मध्ये उत्पन्न, उंची, फुटवे यांची पडताळणी करण्यात आली. त्यातून चांगले आलेले वाण निवडण्यात आले. 2012-13 मध्ये या वाणाचे 12 ठिकाणी प्रयोग घेण्यात आले. त्यातून 'फुले कासारी' हा वाण विकसित करण्यात आला. 2014-18 या काळात त्याची राज्यात दरवर्षी 6 ठिकाणी चाचणी घेण्यात आली. तसेच वडगाव, मावळ, अचलपूर, बुलढाणा, इगतपुरी, नंदूरबार व इतरत्र बहस्थलीय प्रयोग झाले. सर्वच पातळीवर हा वाण चांगला वाटल्यानंतर देशपातळीवरील चाचणीसाठी पाठविण्यात आला. देशात 12 ठिकाणी व राज्यात 60 ठिकाणी झालेल्या चाचणीत सर्वच कसोट्यात हा वाण भरघोस उत्पन्न देणारा ठरला आहे. नुकतीच राज्यातील चार कृषि विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आढावा बैठकीची या वाणाला मान्यताही मिळाली असून राज्यभरात या वाणाची लागवडीसाठी येत्या कांही दिवसात शिफारसही होणार आहे
'फुले कासारी'ची वैशिष्टे म्हणजे हा वाण मध्यम पक्व होणार्या गटाचा आहे. तसेच बुटका असून अतिवृष्टी, वारा यांच्या काळात तग धरून राहणारा आहे. बुटका असल्यामुळे तो जमिनीवर लोळत नाही. कणसे भरदार, सरळ लांब आहेत. नाचणीच्या दाण्याचा रंग तपकिरी आहे. करपा रोगास प्रतिकार करणारा आहे. 105 ते 110 दिवसांचा हंगाम आहे. पारंपारीक वाणाच्या तुलनेत सर्व चाचण्यात या नविन वाणाने 40 टक्के उत्पन्न अधिक दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पोषक मुल्यांच्या बाबतीत कॅल्शीयम, लोह, कार्बोहायर्ड्रेटस् यांचे प्रमाण जास्त आहे.
या संशोधनासाठी डॉ. कराड यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.विश्वनाथा, कृषि संशोधन केंद्राचे संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी संशोधन संचालक डॉ. गजानन खोत आदींचे मार्गदर्शन लाभले.