Uncategorized

Nashik Chain snatching : चक्क पोलिसच निघाला साखळी चोर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलाच्या साथीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तपास करीत दोघा संशयितांना अटक केली आहे. योगेश शंकर लोंढे (३२) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्यास सोमवार (दि. २०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Chain snatching)

१२ नोव्हेंबरला त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानामागील रस्त्यावरून महिला पायी जात होती. त्यावेळी संशयित योगेश हा त्याच्या सतरावर्षीय मित्रासोबत दुचाकीवरून आला. त्याने पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून दुचाकीवरून पळ काढला. महिलेने आरडाओरड केला, मात्र दोघे पसार झाले. 

दरम्यान, पसार झालेल्या योगेश व अल्पवयीन संशयितात मद्याच्या नशेत वाद झाले. वाद वाढल्याने अल्पवयीन संशयिताने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली तर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांनी संशयितांची माहिती समजल्यानंतर योगेशला ताब्यात घेतले. चौकशीत योगेश हा पोलिस शिपाई असल्याचे समोर आले. दरम्यान, दोघांविरोधात सरकारवाडा पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

लाच प्रकरणीदेखील लोंढे निलंबित

योगेश लोंढे सध्या पोलिस मुख्यालयात नियुक्तीस होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना योगेशला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर योगेशला निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा सेवेत रुजू झाला. मात्र, विनापरवानगी सतत गैरहजर राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT