Uncategorized

मराठी साहित्य संमेलन : थाटामाटात काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह साहित्यिकांचाही सहभाग

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने मोठ्या जल्लोषात झाली. संपूर्ण नगरामधून दिंडी फिरून आल्यानंतर साहित्य संमेलनाच्या स्थळी दिंडीचे आगमन आले. याठिकाणी आकर्षक सजवलेल्या चित्ररथातून विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष सुचित्रा महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात शुक्रवार, दि.2 रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीचे उद्घाटन महामंडळ अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. यानंतर दिंडी शहरांमध्ये मार्गक्रमण करून पुन्हा कार्यक्रम स्थळी आली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास महामंडळ अध्यक्ष उषा तांबे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण झाले. ग्रंथ दिंडीमध्ये चित्ररथावरून विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांचे रुप साकारले. ग्रंथ दिंडीमध्ये लोककलाकारांनी लोककला सादर केली. तसेच ग्रंथ दिंडीत अनेक साहित्यिक देखील सहभागी झाले होते. संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि उद्योगपती अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातून मोठ्या थाटामाटात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. अनेक नामवंत साहित्यीक यामध्ये सहभागी झाले. ग्रंथ दिंडीच्या निमित्ताने साकारण्यात आलेले विविध चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधले.  संमलेनानिमित्ताने मंदिर संस्थानच्या कार्यकर्त्यांनी सकाळी  शंखनादही केला.

व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, गिरीश महाजन, अनिल भाईदास पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी लोकसभा अध्यक्ष सुचित्रा महाजन, महामंडळ अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे, पूर्व संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शाहीर साबळे यांनी गायलेले महाराष्ट्र गीत गाऊन मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सन्मानार्थींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. साने गुरुजी यांचे बलसागर भारत होवो गीत वाजून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

व्यासपीठासमोरील दोन्ही बाजूला साहित्यिक व मान्यवरांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र सभास्थळी साहित्यिकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. तर मंडपामध्ये साहित्यिकांच्या उपस्थितीत कमतरता जाणवली.

SCROLL FOR NEXT