Uncategorized

संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर! राजकीय अर्थ काय?

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची सुद्धा डोकेदुखी आणि तितकाच अत्यंत संवेदनशील झालेल्या मराठा आरक्षणाचे काय होणार? हा एकच प्रश्न सतावतो आहे. मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घ्यावी, तर ओबीसी दुखावतील आणि नाही घेतली मराठ्यांची नाराजी ओढवून घ्यायची का? अशी द्विधा मनस्थिती राज्यातील प्रमुख नेत्यांसह राजकीय पक्षांची झाली आहे. केंद्रानेही मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस आणि निर्णायक भूमिका घेतली नसल्याने परिस्थिती अधिक आव्हानात्मक होत चालली आहे. 

अधिक वाचा : मराठा आरक्षण : खासदार धैर्यशील मानेंची सलाईन लावून मूक आंदोलनाला हजेरी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर फुली मारल्याने राज्यात संतप्त भावना आहेत. या भळभळत्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम करत भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णायक रणशिंग फुंकले आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेने सत्ताधारी आणि भाजपही बॅकफुटवर गेले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यामध्ये रंगलेला कलगीतुरा त्याचेच संकेत आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेनेचा आणि भाजपचा सुद्धा ओबीसीमध्ये मोठा जनाधार आहे. त्यामुळे ओबीसींना दुखवायचे नाही, अशी भूमिका त्यांची स्पष्टच आहे. 

अधिक वाचा : संभाजीराजे मुंबईला चला, सरकार चर्चा करायला तयार : सतेज पाटील

अशा परिस्थितीत वंचितचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा संभाजीराजेंना पाठिंबा आणि त्यांनी कोल्हापुरात येऊन मुक आंदोलनाला लावलेली उपस्थिती ही निश्चितच राजकीय भूवया उंचावणारी आहे. शाहु महाराजांनी डॉ. आंबेडकरांना केलेली मदत आणि त्यांची भेट ही ऐतिहासिक अशाच स्वरुपाची आहे. राज्याच्या राजकारणात नेहमीच शिवशक्ती आणि भीमशक्ती हे सातत्याने शब्दप्रयोग केले गेले आहेत. मात्र, याचे अपेक्षित परिणाम अजून दिसून आलेले नाहीत. अशा परिस्थितीत हा शब्दप्रयोग केवळ न राहता त्याला राजकीय अर्थ संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर प्राप्त करून देणार का? हा मुद्दा उपस्थित होत आहे. 

अधिक वाचा : मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंची समिती नेमून चूक केली : हसन मुश्रीफ

मराठा आरक्षणाला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा देत एका दगडात अनेक पक्षी मारले, तर दुसरीकडे संभाजीराजे यांनी अचुक टायमिंगचा वापर करत सर्वपक्षीय लक्ष मराठा आरक्षणाकडे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे काय होणार जसा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे तसाच या दोघांचे एकाच व्यासपीठावर येण्याने काय राजकीय संकेत आहेत हा सुद्धा मुद्दा आहे. 

अधिक वाचा : कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज

या सर्व घटनांवर भाष्य करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, शाहु महाराज आणि आंबडेकरांची भेट झाली होती आणि त्यासाठी मिळालेलं प्रोत्साहान ते ऐतिहासिक आहे. मराठा मोर्चाला विरोध म्हणून प्रती मोर्चे निघत असताना ते मोर्चे थांबवून सामाजिक कटूता येऊ नये, याची काळजी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. त्यामुळे ते मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्या पक्षात केवळ दलित असून नयेत, यासाठी प्रयत्न घेताना दिसत आहेत. 

अधिक वाचा : कोल्हापूर : मराठा मूक आंदोलनात छत्रपती घराण्यातील सर्वजण सहभागी 

प्रकाश आंबेडकरांनी नितीश कुमारांच्या धर्तीवर केलेल्या वंचितच्या प्रयोगाला लोकसभेत यश मिळाले, पण त्यांना विधानसभेत फारसे यश लाभले नाही. वैयक्तिकरित्या पाहिल्यास प्रकाश आंबेडकरांचा जो राग आहे तो काँग्रस आणि राष्ट्रवादी आणि त्यातही शरद पवार यांच्यावर. त्याला कारणीभूत मराठा केंद्रीत राजकारण. प्रकाश आंबेडकरांनी गरीब आणि श्रीमंत मराठा असा भेद करत पाठिंबा दिला आहे. त्यांनी वर्गभेद करून पाठिंबा दिला आहे. 

अधिक वाचा : शरद पवार खरंच मोदींविरोधी उभे राहतील?

हेमंत देसाई पुढे म्हणाले, संभाजीराजे यांना टेलिव्हीजनमधून संधी मिळत असल्याने त्यांचे राजकारण हळूहळू आकार घेत आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेने इतर संघटनांनी आजवर ज्या भूमिका घेतल्या त्या मागे गेल्या आहेत असे म्हणावे लागेल. यापूर्वी, मराठ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध म्हणून भाजप पाठिंबा देत होती, मात्र भाजपला आता हे आंदोलन आता महाविकास आघाडीने हायजॅक केल्यासारखं वाटू लागलं आहे. 

राजेंना भूमिका घ्यावी लागेल 

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सरकारला सूचना केल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयीन लढ्याचाही समावेश आहे. संभाजीराजेंच्या मागण्या मान्य झाल्यास संभाजीराजेंची भविष्यातील वाटचाल काय असेल? हा प्रश्न उभा राहतो. या अनुषंगाने हेमंत देसाई यांनी राजेंना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल असे मत व्यक्त केले. राजेंनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यास अर्थातच ते महाविकास आघाडीच्या जवळ जातील. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्यांना पाठिंबा राहिल. कदाचित मागण्या मान्य झाल्यास त्यांना भविष्यातील राजकीय वाटचाल निश्चित करावी लागेल. 

अधिक वाचा : राज्याच्या राजकारणात घालमेल !

राजेंची राज्यसभेची टर्म संपत चालली असल्याने ते नेमक्या कोणत्या बाजूने आहेत हे स्पष्ट करावं लागेल. त्यांनी संसदेत कोणती भूमिका घेतली या नारायण राणेंच्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. उदयनराजे किंवा संभाजीराजेंनी भूमिका घ्यावी अशी मागणी होत होती. मात्र, उदयनराजेंनी कोणतीच भूमिका न घेतल्याने संभाजीराजे आक्रमक झाले. संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढण्याचे जवळपास अमान्य केलं असलं मागण्या मान्य झाल्यास शेती, नोकऱ्या आदी मुद्यांवर भूमिका घ्यावी लागेल. मराठा आरक्षणावर जो काही निर्णय येईल त्यावर समंजस्य भूमिका घ्यावी लागेल. 

प्रकाश आंबेडकरांची भूमिका विसंगत असल्याचे हेमंत देसाई यांना वाटते. मराठ्यांना आरक्षण हा आंबेडकरांच्या विचारांशी धरून नाही. परंपरागत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना आरक्षण मिळावे अशी भूमिका आंबेडकरांची होती. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका सातत्याने भूमिका बदलत असतात. हा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न दिसत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT