Uncategorized

मराठा आरमार दलाची ३६३ वर्षे

Pudhari News

भूसेना, घोडदळाबरोबरच शत्रूंनाही घाम फोडणारे आरमार आणि दुर्ग निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती काय वर्णावी. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून २४ ऑक्टोबर, १६५७ रोजी मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. आज भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महाराजांना 'Father of Indian Navy' (भारतीय आरमाराचे जनक) मानते. शिवरायांनी आजच्याच दिवशी भारतातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित करणारे ते शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजच होय. 

"ज्याचे आरमार त्याचा समुद्र" ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:च वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते. 

मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते. बहमनी तर होतेतच. पण, कुणालाही वाटले नव्हते की, अशा प्रकारे चांगले आरमार बांधावे. मुघलांनाही ते जमले नाही. खांदेरीचा किल्ला मात्र जिंकण्याचा प्रयत्न मुघलांनी केला. मात्र, तो त्यांच्या कधीच हाती आला नाही. दूरदृष्टी, नियोजन आणि व्यापाराची दृष्टी समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार यशस्वीपणे बांधले आणि त्याला भक्कम साथ दिली ती जलदुर्गांनी!  

                                                                                               

 

 

 

 

 

 

  सिंधुदुर्ग किल्ला

इंग्रजांनाही धडकी भरवणारी घटना म्हणजे, मराठा आरमारान इंग्रजांच्या बारा जहाजांवर हल्ला चढविला. दर्यासारंग आणि त्याचबरोबर दौलत खान यांच्यासारखे अनेक मुस्लिम अधिकारी छ. महाराजांच्या आरमारात होते. दर्यासारंग यांच्या नेतृत्वाखाली दौलत खान, सिद्दी मिस्त्री, मायनाक भंडारी यांनी इंग्रजांची ५ जहाजे बुडविली तसेच त्यांचे एक  जहाज पकडले आणि त्यावर 'स्वराज्या'चे निशाण लावले. ही दर्यासारंग यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. इंग्रजांना मराठा आरमाराचा मोठा दणका मिळाला होता. इतकेच नाही तर, महाराजांच्या आरमाराला कमी लेखणाऱ्या ठेवणाऱ्या ब्रिटीशांनीही कालांतराने मराठा आरमाराची स्तुती केली. आपल्याकडे मराठ्यासारख्या युद्ध नौका हव्या, असे ब्रिटिशांचे म्हणणे होते, असा संदर्भ पोर्तुगीजांच्या पत्रातून सापडतो.

 

 

 

 

 

 

पश्चिम समुद्रकिनारा हा परकीय आरमारी सत्तांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज, डच, इंग्रज, जंजिरेकर सिध्दी होते. त्यावेळी जो व्यापार चालायचा तो खुष्कीच्या मार्गाने कमी आणि समुद्रमार्गाने अधिक चालायचा. भारतातून जी आयात – निर्यात व्हायची ती समुद्रमार्गाने व्हायची. ती प्रामुख्याने पश्चिम समुद्र किनारपट्टीच्या मार्गाने व्हायची. व्यापाराच्या संरक्षणासाठी आरमारी अतिआवश्यकता होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांसारख्या कुशल सेनानीने ओळखलं होतं. अनेक वर्षे समुद्र पार करणं हे पाप आहे, अशा पध्दतीची त्यावेळी धारणा होती. ती मोडीत काढण्याचे काम महाराजांनी केले. त्यामुळे ठराविक अंतर सोडून समुद्रात जाण्याचे धाडस कुणी केले नाही. समुद्रात संचार करणं, आरमार बांधणं आणि समुद्रात संचार करण्यासाठी लागणांर जे तंत्रज्ञान होतं, नौका प्रमुख, शिडांचं ज्ञान, वाऱ्याच्या दिशांचं ज्ञान हे आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. आरमार उभारणीसीठीच्या ज्या नौका लागतात मछवा, पाल त्यावेळी वेगवेगळ्या पध्दतीच्या नौका आरमारासाठी लागायच्या. आपल्याकडे तसे कारागीर नव्हते. म्हणून, शिवाजी महाराजांनी हेदुर्गाडी खाडी आहे, तेथे पहिल्यांदा बाहेरचे (पोर्तुगीज) कारागीर घेऊन आरमार बांधण्यास सुरुवात केली. येथील कारागीरांना त्यांच्याकडून शिकून घ्यायला सांगितले. २४ ऑक्टोबरला त्यांनी आरमारी बेडा बनवला आणि ते समुद्रात सोडण्यात आले. म्हणून आपण 'मराठा आरमार दिन' साजरा करतोय.

                                                                                           

 

 

 

 

 

विजयदुर्ग किल्ला 

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे आरमार आहे, ते कान्होजी आंग्रेंच्या काळात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सबळ आरमार ठरलं. आणि पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं. शिवाजी महाराज केवळ आरमार, नाविक दल करून थांबले नाहीत तर त्यांनी जलदुर्गांची साखळी निर्माण केली. आरमार सुरक्षित राहण्यासाठी नाविक तळ शिवाजी महाराजांनी तयार केले. खांदेरीपासून कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग शिवाजी महाराजांनी समुद्रात तयार केले. संपूर्ण किनारपट्टीचा व्यापार, सैन्य समृध्द होण्यामध्ये याचा उपयोग  झाला. दर्यावर्दी सत्तांना हरवण्याची ताकद आपल्याकडे होती. तशा लढायाही झाल्या. ब्रिटिशांचा आणि जंजीरेकर सिद्दीचा पूर्ण विरोध असताना मुंबईत खांदेरीचा किल्ला बांधला आणि तो आपल्या ताब्यात ठेवला. कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. (समुद्रात बेटावर हा जवळपास ३ किमी. आत हा खांदेरीचा किल्ला आहे.) किल्ला बांधायला लागणारे साहित्य हे आरमारातूनच नेण्यात आले होते. 

शिवाजी राजेंच्या काळात जर समुद्रात संचार करायचा असेल तर इंग्रज, पोर्तुगीजांचा परवाना घ्यायला लागायचा. परंतु, नंतर इंग्रज, डच, पोर्तुगीजांनाही अरबी समुद्रात संचार करायचे असेल तर मराठ्यांची परवानगी घ्यायला लागली, इतका दरारा त्याकाळात शिवरायांनी निर्माण केला होता. 

                                                                                       

 

 

 

 

 

 

 

पद्मदुर्ग

आजही काही जलदुर्ग वर्षानुवर्षे ज्वलंत इतिहास आणि पराक्रमाची साक्ष देत उभी आहेत. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग याची उदाहरण सांगता येईल. अरबी समुद्रातील कुरटे बंदरावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. त्यावेळी महाराज त्यास 'सिंधुसागर' म्हणायचे. याच किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. ते शिवपुत्र राजाराम महाराजांनी बांधलं होतं. त्यास शिवराजेश्वर मंदिर (शिवमंदिर स्मारक) म्हणूनही ओळखलं जातं. तर सिंधुदुर्ग किल्ल्याला 'शिवलंका' म्हटलं गेलं.  

शिवरायांनी आरमार विकसित करून स्वराज्य रक्षणाचा जो पाया रचला, त्यावर कळस चढवण्याचे कार्य शिवरायांचा आदर्श ठेवून इंडियन नेव्ही यशस्वीपणे करत आहे. 

शब्दांकन : स्वालिया न. शिकलगार, पुढारी ऑनलाईन डेस्क 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT