Uncategorized

बैलपोळा विशेष : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘बेंदूर’

Pudhari News

पुढारी ऑनलाईन : सीमा पाटील

भारत हा कृषीप्रधान देश. अर्थातच महाराष्‍ट्रालाही मोठी कृषी संस्‍कृती लाभली आहे. या कृषी संस्‍कृतीत महाराष्‍ट्रीयन लोकांचे सण आणि उत्‍सवही कृषी पुरकच आहे. यातीलच एक महत्त्‍वाचा सण म्‍हणजे बैलपोळा किंवा बेंदूर. शेतात राबणार्‍या लाडक्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा सण. मालकासाठी दिन-रात्र शेतात राबणार्‍या साथीदारांचे ऋण फेडण्‍याचा सण म्हणजेच बैलपोळा. 

बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस महाराष्‍ट्रीयन उत्‍सवच जणू. कृषीप्रधान व्यवस्‍थेमुळे या सणाला महाराष्‍ट्रात विशेष महत्त्व आहे. बळीराजाच्या सवंगड्याबाबत कृतज्ञता व्यक्‍त करणारा हा मोठ्या उत्‍साहात साजरा करण्याची परंपरा महाराष्‍ट्रात आहे. जणू शेतकर्‍यांच्या सवंगड्यांची दिवाळीच म्‍हणजे बैलपोळा. 

बैलपोळ्या दिवशी बैलाची पूजा करतात. तसेच मातीच्‍या बैल जोडीचीही पूजा केली जाते. पूर्वीच्‍याकाळी चिकल, मातीच्‍या बैलाची पूजा केली जात होती. कुंभार घरोघरी जाऊन मातीची बैल जोडी देत असत. पण आता त्‍याची जागा काही प्रमाणात प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्‍या बैलांच्‍या मूर्तींनी घेतली आहे. 

हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्या केल्या जातात. अशा ह्या आपल्या बैलपोळा सणाची महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्‍याची गाणी म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' म्‍हणजे पाटील, सावकार, सरपंच ते तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल गावतील देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात.  

कशी केली जाते बैलांची पूजा

आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो. या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो.  बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी, चाबूक या दिवशी वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.  पोळ्याला त्यांना नदीवर  किंवा ओढ्यात नेऊन अंघोळ घालण्यात येते. नंतर मस्‍त चारून घरी आणण्यात येते. या दिवसाच्‍या आधल्‍या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांदा शेकणे' अथवा 'खांड मळणी' करणे असे म्‍हणतात.

यादिवशी बैलाच्‍या पाठीवर नक्षीकाम केलेली रंगीत झूल घातली जाते.  सर्वांगावर गेरूचे ठिपके दिले जातात. शिंगांना बेगड, रंगीत गोंडे बांधले जातात. डोक्याला बाशिंग बांधले जाते. गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा घातल्‍या जातात. गळ्‍यात बांधायला नवा कासरा  घेतला जातो.  बैलांच्‍या पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. अशाप्रकारे बैलांची पूजा केली जाते. 

संध्‍याकाळच्‍या वेळी गावातून  काढली जाते मिरवणूक

संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल ताशांसोबत गावातून मिरवणूक काढली जाते. यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर बांधलेला असतो व तो ओढीचा असतो. त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात.  महाराष्‍ट्रातील काही गावांमध्ये तर जत्राच भरवली जाते. पूर्वी यानिमित्‍त बैलांसाठी शर्यतीचे आयोजन केले जात असे मात्र सध्या कायद्‍याने शर्यतींवर बंदी आली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT