Uncategorized

पाच टप्प्यांत महाराष्ट्र हाेणार ‘अन्लॉक’

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

येत्या 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय होऊन जेमतेम 4 दिवस उलटले असतानाच संपूर्ण महाराष्ट्र पाच टप्प्यांत अन्लॉक करण्याचा निर्णय तत्त्वत: झाल्याची घोषणा आपत्ती व व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय जाहीर करायचा असतो तो वडेट्टीवार जाहीर करून मोकळे झाले आणि सरकारची एकच धांदल उडाली. अन्लॉकचे पाच टप्पे निश्‍चित झाले असले तरी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत असून, त्यानंतरच अन्लॉकचा निर्णय सविस्तर जाहीर केला जाईल, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाला करावा लागला. 

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा टप्प्यांचा अन्लॉक एक-दोन दिवसांत कोणत्याही क्षणी जाहीर करू शकतात. फेसबुक लाईव्हवर राज्याशी संवाद साधताना ही घोषणा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे नियोजन होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आटोपताच वडेट्टीवारांनी बाहेर येऊन अन्लॉकचा संपूर्ण तपशीलच 'तत्त्वत:' जाहीर करून टाकला. आता मुख्यमंत्र्यांच्या हाती केवळ या निर्णयाची औपचारिक घोषणा करणे तेवढे उरले आहे. 

सरकारी गोंधळ 'अनलॉक'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अन्लॉकचे पाच टप्पे जाहीर करण्याचा निर्णय झाल्याचे सांगताना 'तत्त्वत:' हा शब्द विसरले आणि वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्र अन्लॉक होत असल्याचे ब्रेकिंग वृत्त झळकवणे सुरू केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने खुलासा करीत सांगितले की, राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेडवर दाखल रुग्ण आणि साप्‍ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हे अन्लॉकचे निकष आहेत. हे निकष प्रशासकीय घटक आणि जिल्हा यंत्रणेकडून तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन या अन्लॉकची अंमलबजावणी केली जाईल. या विषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळवली जाईल, असे राज्य शासनाने स्पष्ट केल्याचेही या जनसंपर्क विभागाने म्हटले होते. त्यावरून पाच टप्प्यांत अन्लॉक हा निर्णय तूर्त अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले. पाठोपाठ मंत्री वडेट्टीवार यांनीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्र अन्लॉक करण्याचा हा निर्णय  तत्त्वत: घेतला असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे जाहीर केले. बैठकीतील निर्णय जाहीर करण्याची घाई वडेट्टीवार यांनी केली आणि हा सरकारी गोंधळ 'अन्लॉक' होऊन चव्हाट्यावर आला. 

ठाणे पहिल्या, तर मुंबई दुसर्‍या टप्प्यात

पहिला टप्पा । 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट व 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले ऑक्सिजन बेड. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

दुसरा टप्पा ।  5 ते 10 टक्के दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट व 25 ते 40 टक्केपर्यंत भरलेले ऑक्सिजन बेड.  अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश.

तिसरा टप्पा । 10 ते 15 टक्के दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट व 40 ते 60 टक्केदरम्यान भरलेले ऑक्सिजन बेड. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश. 

चौथा टप्पा । 15 ते 20 टक्के दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट व 60 ते 75 टक्केदरम्यान भरलेले ऑक्सिजन बेड. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश. 

पाचवा टप्पा । पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यापेक्षा जास्त व केवळ 75 टक्केपेक्षा जास्त भरलेले ऑक्सिजन बेड. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. सुदैवाने संपूर्ण रेड झोनच्या या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही.

18 जिल्ह्यांत काय सुरु होणार?

 रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृहे, उद्याने, वॉकिंग, क्रीडा संकुले, ट्रेकिंग, खासगी, ई- कॉमर्स, सरकारी कार्यालये, मालिका व चित्रपटांचे शूटिंग, जिम, सलून, सार्वजनिक बससेवा, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे आदी सुरू होणार. या सोबतच जमावबंदी राहणार नाही, आंतरजिल्हा प्रवासास मुभा असेल तर, इतर राज्यांतून येणार्‍यांवर काही निर्बंध असतील.

6 जिल्ह्यांत काय सुरू राहील?

हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृहे, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू होणार   उद्याने, सार्वजनिक जागा, खुली मैदाने, मार्निंग वॉक, सायकलिंग सुरू होणर  खासगी व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार  क्रीडा संकुले (इनडोअर व आऊटडोअर)- सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 सुरू राहणार  मालिका व चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार  बैठका, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक आदींसाठी 100 व्यक्तींची मुभा  मंगल कार्यालये, हॉलमध्ये 100 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करता येणार  अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थित राहता येईल  ई कॉमर्स, बांधकाम, शेतीशी संबंधित सर्व दुकाने, कामे सुरु राहणार  सार्वजनिक बस 100 टक्के क्षमतेने सुरू होणार  आंतरजिल्हा बंदी नसेल, ई पास गरज नाही. रेड झोन जिल्ह्यांत जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

 

SCROLL FOR NEXT