Uncategorized

India@75 : लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती दारूबंदीची चळवळ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्‍य नेते होते. काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. देशपातळीवर हे करत असतानाच ते वृत्तपत्रही चालवत होते. शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सवही त्यांनीच सुरू केले; पण फार कमी लोकांनाही माहिती असेल की, लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात दारूबंदीचीही चळवळ जोमाने चालवली होती. एका बाजूने स्वातंत्र्याची चळवळ चालवत असतानाच टिळक अशा प्रकारे लोकजागृतीचेही कार्य करत होते. लोकमान्य टिळक दर्शन हा ग्रंथ भा. द. खेर यांनी लिहिला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक यांच्या दारूबंदीच्या चळवळीचा उल्लेख आलेला आहे.

ब्रिटिश सरकारकडून मद्यपानाचे समर्थन

ब्रिटिश सरकार मद्यपानाला विरोध करत नसे. सरकारच्या खजिन्यात पडणारी भर, या कारणामुळे ब्रिटिश सरकार मद्यपानाचे समर्थन करत होते. तर दुसरीकडे काँग्रेस नियमितपणे दारूबंदीचा ठराव करायची आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असे. त्या काळातील वृत्तपत्रांतही मद्यपानाला विरोध होत असे. मद्यविक्रीची अधिकाधिक दुकाने कशी सुरू होतील, हाच सरकारचा कटाक्ष होता. १९ व्या शतकात मद्यपान विरोधी कृती समिती स्थापन झाली होती. पण या समितीच्या टीकांवर सरकार फारसे लक्ष देत नव्हते, असे खेर यांच्या ग्रंथात म्हटले आहे.

टिळकांनी स्‍थापन केली मद्यपानबंदी केंद्रे

टिळकांच्या त्या वेळी जनमाणसावर मोठा प्रभाव होता. टिळकांनी मद्यपानबंदी केंद्रे स्थापन केली. या चळवळीत हजारो स्वयंसेवक सहभागी झाले. हे स्वयंसवेक दारूच्या दुकानाबाहेर थांबत आणि मद्यपींना परत जाण्यास सांगत. काही दारू पिणारे हे ऐकण्याच्या स्थितीत नसत. तेव्हा हे स्वयंसेवक दारूच्या दुकानासमोर झोपून त्यांना विरोध करत. या चळवळीमुळे टिळकांचे सामर्थ्य अधिकच वाढू लागले. दारूचे ठेकेदार आणि सरकार यांचे मोठे नुकसानही होऊ लागले होते. टिळकांनी अगदी खेड्यापाड्यांत मद्यपानबंदीकेंद्रे सुरू केली होती. "पुण्यात ब्रिटिशांचे राज्य संपुष्टात आले असून टिळकांचे राज्य सुरू आहे," असा उल्लेख त्या वेळच्या पोलिस दफ्तरात आहे, असे खेर यांच्या ग्रंथात म्हटले आहे.

दारुबंदी चळवळ रोखण्यासाठी पोलिसांनी शांतता प्रस्थापित करणे हे कारण देत स्वयंसेवकांवर हल्ले करायला सुरुवात केली. शिवाय दारू दुकानाबाहेर विरोधासाठी जमलेल्या स्वयंसेवकांवर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल होऊ लागले. पुढे टिळकांना अटक झाल्यानंतर ही चळवळ स्थगित झाली, असेही या ग्रथांत नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT