Uncategorized

कृष्णा नदीची पाणी पातळी घटली 

Pudhari News

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात कृष्णा नदीची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे नदीकाठचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सिंचनाला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पाणी तातडीने सोडण्याची मागणी होत आहे. 

महापुरामुळे कृष्णाकाठची पिके उद्ध्वस्त झाली होती. वीज खांब पडल्यामुळे पुरवठा ठप्प झाला होता. महतप्रयासाने काही गावांत शेतीची वीज सुरू झाली आहे. शेतीसाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उष्णता वाढल्याने पिण्यासाठीही पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. 

गेल्या चार-पाच दिवसांत  ताकारी, दुधोंडी, नागराळे, पुणदी, बुर्ली, आमणापूर, धनगाव, अंकलखोप, भिलवडी, नागठाणे, वाळवा, कसबे डिग्रज, सांगलीवाडी, सांगली या ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे.

यामुळे  सिंचनाला पाणी कमी पडू लागले आहे. विशेषत: महापुरात वाचलेल्या उसाच्या लागणीस  फटका बसत आहे. काहींनी उसाची मेहनत केली आहे. खत टाकले आहे. यामुळे जमीन पूर्णपणे वाळली आहे.  नदीची  पातळी कमी होत असल्याने शेतकर्‍यांना विद्युत पंप वारंवार खाली बसवावे लागत आहेत. पाटबंधारे खात्याने  कोयना धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी होत आहे. अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

रात्रीच्यावेळी वाळू उपसा जोरात 

महापुराने कृष्णा नदीत वाळू मोठ्या प्रमाणात आली आहे. पाणी कमी झाल्याने नदीपात्रात जागोजागी वाळूचे ढिगच्या ढीग दिसत आहेत. या वाळूवर नदीकाठच्या गावातील काही नेते डल्ला मारत आहेत. रात्रीच्या वेळी जेसीबी व ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा जोमात सुरू आहे. उपसा केलेली वाळू प्रशासनाच्या नजरेस येऊ नये, यासाठी दडवून ठेवली जात आहे.

 

SCROLL FOR NEXT