कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडिराम सुखटणकर यांचे बुधवारी रुई (ता. हातकणंगले) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक भाऊ, भाचे, भाची असा परिवार आहे.
सुखटणकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रुई येथील 'न्यू भारत नाट्य क्लब'मधून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. मराठी रंगभूमीवर 'वेगळं व्हायचंय मला', 'मुंबईची माणसं', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'दिवा जळू दे सारी रात', 'तुझं आहे तुझपाशी' या नाटकात त्यांनी अभिनय केला. त्यांनी 85 हून अधिक मराठी सिनेमांत भूमिका केल्या. यामध्ये 'बाई मी भोळी, 'कुंकवाचा करंडा', 'जोतिबाचा नवस', 'सून लाडकी या घरची', 'कौल दे खंडेराया', 'एकटा जीव सदाशिव', 'सोयरिक', 'अष्टविनायक', 'भिंगरी', 'सावज', 'सहकारसम—ाट', 'तोतया आमदार', 'भुजंग', 'धुमधडाका', 'लेक चालली सासरला', 'दे दणादण', 'बळीराजाचे राज्य येऊ दे' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
'धनगरवाडा' हा त्यांचा शेवटचा सिनेमा तर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतही त्या काम करत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने 2006 मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 2017-18 मध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला होता.