कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे', 'मास्क वापरा', 'स्वच्छ भारत…' अशा सामाजिक संदेशांसह वाघासारखे पट्टे, पाठीवर नक्षीदार झूल, गेरूच्या ठिपक्यांनी सजविलेले संपूर्ण शरीर, शिंगांना बेगड, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात तोडे आणि शिंगांना मोरपंख अशा विविध प्रकारच्या सजावटींनी सजविलेल्या सर्जा-राजा बैल जोड्यांनी आबालवृद्धांची मने जिंकली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून बेंदूर सण साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे बैलांना अंघोळ घालण्यासाठी पाणवठ्यांवर बैलजोडी घेऊन शेतकरी सकाळपासूनच दाखल झाले होते. शहरातील पंचगंगा नदी घाटावर आबालवृध्दांनी गर्दी केली होती.
बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देऊन त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकण्यात आले. त्यानंतर पाणवठ्यांवर अंघोळ घालण्यात आली. यानंतर पाठीवर नक्षीदार झूल, गेरूच्या ठिपक्यांची सजावट, शिंगांना बेगड, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात तोडे आणि शिंगांना मोरपंख लावून बैलांची आकर्षक सजावट करण्यात आली. रणहलगी-कैचाळ-घुमक्याच्या तालात बैल मिरवणुकीने घरापर्यंत नेण्यात आले. दुपारी पुरणपोळी व गोड अन्नाचा नैवेद्य बैलांना खायला घालण्यात आला. घरोघरी मातीच्या बैलजोडींची पूजा देवघरात करण्यात आली. पिंपळाच्या पानांचे तोरण, चकलीसह पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.