कराड : प्रतिनिधी
नांदलापूर (ता. कराड) येथील चिमुकली दोघे सख्खी भावंडे शनिवारी अचानक बेपत्ता झाली. याबाबतची फिर्याद पोलिसांत दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरु झाला. दोघाही चिमुकल्या भावंडांचा आज नांदलापूर येथीलच दगडखाण परिसरातील डोहामध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, डोहाच्या काठावर दोन्हीही चिमुकल्यांची कपडे आढळून आल्याने ते दोघेही पोहण्यासाठी डोहामध्ये गेल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हणमंत अशोक मुनेकर (वय 9 वर्षे) व उदय अशोक मुनेकर (वय 7 वर्षे, दोघेही सध्या रा. धनगरवाडी, नांदलापूर, ता. कराड, मूळ रा. कोरवार, ता. सिंधी, जि. विजापूर-कर्नाटक) असे डोहात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. दरम्यान, सौ. भूमिका अशोक मुनेकर यांनी दोघेही भावंडे बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनगरवाडी-नांदलापूर येथील मोलमजुरी करणार्या कुटुंबातील हणमंत मुनेकर व उदय मुनेकर ही दोन चिमुकली सख्खी भावंडे बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत अल्पवयीन दोन मुले बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. त्यानंतरही पोलिसांच्या मदतीने बेपत्ता दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरु झाला. मात्र त्यांचा कोठेच ठावठिकाणा लागेना. शनिवार, दि. 9 रोजी रात्री उशिरापर्यंत दोघांचीही शोधमोहिम सुरु होती. नातेवाईक नांदलापूरसह आजुबाजूच्या परिसरात जाऊन लोकांकडे विचारपूस करत शोध घेत होते. परंतु हणमंत व उदय दोघेही चिमुकले सापडले नाहीत. रविवारी सकाळी पुन्हा त्यांची शोध मोहिम सुरु झाली.
दरम्यानच्या कालावधीत नांदलापूरलगत डोंगराकडेला दगडखाणी असून या डोंगराच्या उत्खननामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्या खड्डयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी सकाळी दोन्ही चिमुकल्याची शोधमोहिम सुरु असताना काही लोकांना त्या डोहाच्या कडेला दोघांचीही कपडे आढळून आली. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांसह इतरांना सांगितली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना डोहातील पाण्यावर पालथ्या स्थितीत दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे नांदलापूरसह परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पोलिस कर्मचारी सुनील पन्हाळे, मिलिंद बैले, शंकर गडांकुश, रामदास तुंबडे यांनी भेट दिली.