Uncategorized

 ‘…अजूनही वेळ गेली नाही; स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी वास्तव स्वीकारायला हवं’ (भाग-१)

Pudhari News

– अर्जुन नलवडे, पुढारी प्रतिनिधी

पुन्हा शासनाने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग, स्पप्नभंग आणि घेतलेलं कष्ट वाया गेले, अशी एक निराशा निर्माण झाली. त्यातूनच उमेदवारांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचं धारिष्ट दाखविलं. यानिमित्ताने स्पर्धा परीक्षा विश्वातील दाहक वास्तव दाखविण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण व्हावं, असा या लेखाचा मुळीच उद्देश नाही; पण स्पर्धा परीक्षेचा बाजार मांडणार्‍या खासगी संस्था, व्यक्ती, अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना या वास्तवाची जाणीव व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दुसरीदेखील ही एक बाजू आहे, हे लक्षात यावं याचसाठी हा लेखन अट्टाहास… 

साधारण २००७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचं वातावरण तयार निर्माण होण्यास सुरुवात झाली. आज ते वातावरण किती मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पसरलंय आणि त्याचे परिणाम किती भयंकर होत आहेत, याकडे तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी सोयीस्करपणे आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. हीच गोष्ट अनेकांच्या उदध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. 

शहरी, निमशहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत आताच्या शिकत असणाऱ्या आणि शिकून झालेल्या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षा पास झालेल्या, अधिकारी झालेल्यांची भाषणं मोठ्या प्रमाणात घडवून आणली गेली. मुळात अधिकारी पदावरून लोकसेवेच्या कार्याची सुरुवातच शून्य असताना आपल्या जीवनाचा प्रवास (स्पर्धा परीक्षा पास होईपर्यंतचा) किती खडतर होता, हे रंगवून सांगणारी अर्धवट चरित्रं पुस्तकांच्या रूपानं बाजारात पोहचली. त्यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय आणि शेवटी यश या सर्व गोष्टी केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात असा बडेजावपणा आणून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात फुगवल्या गेल्या की, शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होणाऱ्या तरुण-तरुणींची लाट स्पर्धा परीक्षांकडे वळू लागली. 

एखादं पुस्तक वाचताना (कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र) त्या पुस्तकातील नायकाच्या जागी वाचक स्वत:ला ठेवतो. आणि मग त्या नायकाच्या जीवनात घडणाऱ्या घटना, त्याचा तो खडतर प्रवास याचा वाचक स्वत:च्या जीवनात घडणाऱ्या घटना… स्वत:चा खडतर प्रवास यांची तुलना करायला लागतो. अशा पुस्तकांत वाचक हा नायक आणि स्वत: यामध्ये जास्तीत-जास्त साम्य शोधण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बऱ्याच वेळेला वाचक यशस्वी होतो अन् काही वेळेला तो अयशस्वी होतो. ज्या वेळी तो अयशस्वी होतो, त्यावेळी तो जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इथंच वाचक फसतो. अशी फसवणूक… स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकाऱ्यांची 'अर्धवट' आत्मचरित्रात्मक जी पुस्तकं निघाली, त्यातून सर्रासपणे झालेली दिसेल. मी अशा पुस्तकांना  'अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं' असं म्हणतो. कारण अशा आत्मचरित्रांचे नायक हे आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरुवात ज्या ठिकाणी होणार असते, त्या ठिकाणापर्यंतचा आपला जीवनप्रवास मांडतात. सामान्य वाचक म्हणून आमची अपेक्षा अशी असते की, जिथं तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आरंभ झाला तिथून पुढचा प्रवास मांडणं गरजेचं आहे. थोडक्यात अधिकार पद मिळाल्यानंतर त्या अधिकार पदाचा वापर करून समाजाच्या भल्यासाठी तुम्ही किती झगडलात आणि त्यामध्ये किती यश मिळवलंत हे सांगणं तुमच्या चरित्रात अपेक्षित असतं. ही खरी प्रेरणा असू शकते. पण दुर्दैवानं ही उणीव स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अर्धवट चरित्रात आढळते (याला काही अपवाद आहेत.).

दुसरी बाब अशी की, हे लिखाण 'वाचक' डोळ्यासमोर ठेवून केलेलं लिखाण आहे. ज्यावेळी असा वाचक डोळ्यासमोर असतो, त्यावेळी आर्थिक गणितं असतात. अशा वेळी एखादी घटना, प्रसंग रंगवून किंवा अतिशयोक्ती करून सांगण्याचा निश्चित प्रयत्न होतो. साहित्याच्या इतर प्रकारामध्ये ते शक्य आहे; परंतु चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये ते शक्य नाही. पण या बोरूबहाद्दरांनी ते शक्य करून दाखवलं. या सर्वांचा परिणाम असा झाला की, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचण्यापेक्षा ही 'अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं' जास्त प्रमाणात वाचली जाऊ लागली. खरं तर स्पर्धा परीक्षांच्या मैदानात उतरल्यानंतर दोन महिन्यांतच 'मी पास होईल की नाही… हा अभ्यासक्रम मला झेपेल की नाही' अशा प्रश्नांची उत्तरं प्राथमिक पातळीवर अंतर्मनात मिळतात.

थोडक्यात आपली पात्रता आणि मर्यादा प्रत्येकानं ओळखलेली असते. तरीसुद्धा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्वत ध्येयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. 'जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त' अशी स्थिती होते. सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारं नैराश्य, गावाकडची दुष्काळी परिस्थिती, स्वत:ची घुसमट, कमी दर्जाचे काम करण्याची नसलेली मानसिकता, मुलींच्या बाबतीत घरातून लग्नासाठी होत असलेली घाई… त्यातून मुलींचा वाढत जाणारा तणाव या सर्व 'नकारात्मक बाजू' स्पर्धा परीक्षेच्या कृत्रिम वातावरणातून जन्म घेतात. विद्यार्थी आणि पालकसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बऱ्याचदा निराशा पदरात पडते. 

मी आठवीत होतो. त्यावेळी कोल्हापूरातून एक विद्यार्थी आयएएसची परीक्षा पास झाला होता. त्याचं उदाहरण आमचे शिक्षक वर्गात देत असत. या घटनेला नऊ वर्षं उलटून गेली असावीत. तरीसुद्धा त्याचा फोटो अॅकॅडमी व क्लासेसच्या रंगीत, गुळगुळीत जाहिरातीवर झळकतो. अशा शेकडो विद्यार्थ्यांचे फोटो या जाहिरातींवर असतात. त्यांच्या त्या जाहिरातीत स्पर्धा परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोंची संख्या इतकी मोठी असते की, जणू काही दरवर्षी क्लासेसमधून इतके विद्यार्थी पास होत आहेत; परंतु वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी आहे. आपल्या प्रभावी जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना भुरळ घातली जाते. आयएएस व आयपीएएस होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना (फक्त हुशार विद्यार्थ्यांना बरं का) हे लक्षात का येत नाही की, खरंच क्लासेसवाल्यांकडे पैसे भरून अधिकारी होता आलं असतं तर श्रीमंत बापाची पोरं अधिकारी झाली नसती का? पण 'स्पर्धा परीक्षाग्रस्त' झालेल्या विद्यार्थ्यांना कोण समाजावणार? 

पुणे शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी जिथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते, अशा ठिकाणी किंवा पुणे महानगरपालिकेच्या शहरी बसेस आणि बस स्थानकांवर लाखो रुपयांच्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती असतात. त्या इतक्या प्रभावी आणि परिणामकारक असतात की, खेड्यातल्या सामान्य कुटुंबातून आलेला  एखादा तरुण 'स्पर्धा परीक्षा पास होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय' असं मनोमन ठरवतो आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरायला सुरुवात करतो. त्या स्वप्नांच्या दुनियेत ध्येयाच्या अनिश्चिततेचा काळाकुट्ट अंधार आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात आलंच तर तो जाणीवपूर्वक त्याच्याकडं दुर्लक्ष करतो.

संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसचा भरणा आहे. तरीसुद्धा शहरी व निमशहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना पुण्यातील क्लासेसविषयी खूप आकर्षण वाटतं. हे क्लासेसवाले सुरूवातीला 'प्रवेश विनामूल्य' या बॅनरखाली व्याख्यानं भरवतात. त्यातून स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची गरज कशी आहे, आम्ही मार्गदर्शक म्हणून कशी भूमिका बजावतो, आमच्या अॅकॅडमीमधून आत्तापर्यंत किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस झाले यांची रसभरीत वर्णनं सांगितली जातात. अप्रत्यक्षपणे 'क्लासेस स्पर्धा परीक्षा करण्याकरता किती गरजेची आहेत' हे विद्यार्थ्यांच्या मनावर पुन्हा-पुन्हा बिंबवलं जातं. अनेक अॅकॅडमी-क्लासेसच्या ऑफिसमध्ये (अतिशय बोलक्या असणाऱ्या) काही व्यक्ती अशा पद्धतीनं क्लासेसची माहिती सांगण्यासाठी बसवलेल्या आहेत की, जणू काही श्रीकृष्ण अर्जुनाला स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात लढायचं कसं याचाच उपदेश करतो आहे!

विशेष म्हणजे त्यांच्या आवारात दहावी-बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा गर्दी होती. मी जिज्ञासा म्हणून त्यांना विचारलं की, 'तुम्ही इथं कसे काय?' त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ''आम्ही स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचला प्रवेश घेतो आहोत.'' तेव्हा तर मी डोक्याला हात मारून घेतला. अरे बाप रे! आता तर दहावी-बारावीच्या मुलांनाही या क्लासेस-अॅकॅडमीवाल्यांनी स्पर्धा परीक्षेच्या चिखलात ओढलं. काहींनी तर जागोजागी महानगरपालिकेच्या बसस्थानकांवर 'आज आणि उद्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी' अशी भली मोठी जाहिरात केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभ्यासिकेसह वसतिगृहाच्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर हे अॅकॅडमी-क्लासेसवाले खासगी बसेस, खासगी वसतिगृह, उपहारगृह, खानावळी उभे करून करोडो रुपयांची उलाढाल किंवा व्यवसाय करत आहेत. या प्रत्येक अॅकॅडमी-क्लासेसवाल्यांचे स्वत:चे प्रकाशन, मासिक, साप्ताहिक, अभ्यासिका आहेत.

या क्लासेसवाल्यांच्या जाहिरातीत क्लासेसच्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्य ठळकपणे दिलं जातं की, 'तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन' पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असते. पूर्वीच्या बॅचमधील एखादा विध्यार्थी, जो स्पर्धापरीक्षा पास झालेला नाही किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय अशा विद्यार्थ्यालाच किमान वेतनावर लेक्चर घ्यायला लावतात. इतकं सगळं करूनसुद्धा विद्यार्थ्यांना सांगतात काय? ''आम्ही फक्त दिशा दाखवण्याचं काम करतोय, यश मिळेलच याची शाश्वती देत नाही'' हे महत्त्वाचं वाक्य वापरून, पैसे घेऊन जबाबदारी डावल्याचं स्पष्ट दिसून येतं. विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीची स्वप्नं दाखवून, जाहिरातीत त्यांची दिशाभूल करून, पाठांतराचा अस्सल नमुना असणाऱ्या अधिकाऱ्यांची व स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची भाषणं (प्रेरणादायी व्याख्यानं बरं का!) घडवून आणून स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये अॅकॅडमीवाले-क्लासेसवाले कमावत आहेत. याकडे आपलं लक्ष जाणार आहे का? 

जाहिरातीच्या आणि स्मार्टफोनच्या युगात एखाद्या विद्यार्थ्याचा बळी सहज जातो. आज इंटरनेटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आहे. या भाषणबाजीचा परिणाम असा झाला की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनधिकृतपणे (पॅरासाईट) राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. हेच विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीत असणाऱ्या जिन्याखाली, गॅलरीमध्ये राहू लागले. त्याचा ताण वसतिगृह प्रशासन व्यवस्थेला सहन करावा लागला आणि आजही लागतो आहे.

एक सुप्रसिद्ध आयपीएस (स्पर्धा परीक्षेतील आयकॉन) आपल्या व्याख्यानातून तरुणांची दिशाभूल करत सुटलेत. त्यांच्या व्याख्यानाचा असा परिणाम होतो की, विद्यार्थी वास्तवतेपासून दूर जात स्वप्नांच्या दुनियेत रममाण व्हायला लागतो. त्या अधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी (शासनाची बरं का!) त्यांच्या अंगावरील शासकीय गणवेश, त्यांचा मानसन्मान, त्यांना इतरांकडून मिळणारी आदराची वागणूक या सर्वांत तो विद्यार्थी स्वत:ला ठेवायला लागतो. काही अधिकाऱ्यांनी वक्तृत्वाचं बाळकडूच प्यायलं होतं की काय, अशी शंका त्यांचं भाषण ऐकल्यावर येते. वक्तृत्व म्हणण्यापेक्षा 'पाठांतराचा' तो उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा. असे उमेदवार अधिकारी झाल्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षासंबंधीची व्यासपीठंच गाजवत सुटतात! काहींनी  तर आपल्या वक्तृत्वाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर आपल्या 'परिवारा'चा इतका मोठा व्याप वाढवलाय की, आता ते फक्त 'संस्थानिक'च व्हायचेच बाकी राहिलेत. हे अधिकारी प्रचंड हुशार आहेत; परंतु ते आपल्या बुद्धीचा वापर समाजसेवेसाठी नाही तर व्यवहारासाठी (फायदेशीर व्यवसायासाठी) व स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करतात. सकारात्मकतेचा अतिरेक झाला की, त्यातूनही नकारात्मक बाजू जन्म घेते, हे या अधिकाऱ्यांच्या आणि क्लासेसवाल्यांच्या उद्योगांतून स्पष्ट होते.

पुण्यात असणाऱ्या विविध अभ्यासिकांमध्ये हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आपलं नशीब अजमावत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये पुण्यातील प्रशस्त ग्रंथालयं आणि विविध प्रकारची पुस्तकं मिळणारा अप्पा बळवंत चौक (एबीसी) ही महत्त्वाची भूमिका बजावतात; पण आज ही ग्रंथालयं आणि अ.ब. चौक हा फक्त स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातच ओळखला जातोय. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुण्यातील साहित्य विश्व हे नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे. आणि दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय आणि अखिल विश्व साहित्य संमेलनामध्ये पुण्याची भूमिका ही महत्त्वाची असते. परंतु अशा प्रकारची साहित्य संमेलनं ही जशी जातीची, धर्माची, विचारसरणीचीसुद्धा होऊ लागली. तशाच प्रकारे त्यामध्ये आणखी एकाची भर पडली. ती म्हणजे 'स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलना'ची. माझी पुढची पिढी कोणाचा इतिहास अभ्यासणार आहे? थोर समाजसुधारक म्हणून क्लासेसकर्त्यांचा इतिहास अभ्यासणार आहे काय? का गुगल, फेसबुक, ट्वीटरचे संस्थापक किंवा ऑलिंपिकमध्ये मायकेल फ्लेप्स, उसेन बोल्ट यांसारखे सुवर्णपदकांचे विश्वविक्रम करणाऱ्या व्यक्तींचा इतिहास अभ्यासणार आहेत? माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेतलं वाया गेलेलं आठ-दहा वर्षांतील उद्ध्वस्त जीवन… हा भविष्यातील इतिहास अजिबात बनू शकत नाही!!! आमचं असं स्वत:चं कर्तृत्व काय? की ते कर्तृत्व भविष्यातील पिढीसमोर 'सोनेरी इतिहास' म्हणून उभा असेल? हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यानं स्वत:ला विचारावा. 

क्रमशः 

भाग-२ : '…अजूनही वेळ गेली नाही; स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी वास्तव स्वीकारायला हवं' (भाग-२)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT