पुणे; पुढारी ऑनलाईन : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाकडून २ ऑगस्टपासून साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहेत. शरद पवार यांचीदेखील पुण्यात साक्ष नोंदवण्यात येणार असून त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येणार आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली आहे.
वाचा : 'भीमा कोरेगाव प्रकरणी समांतर चौकशी करून सत्य बाहेर आणा'
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांची साक्ष गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगापुढे नोंदवली जाणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे आयोगाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. आता चौकशी आयोगाचे कामकाज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला धक्का देत या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे सोपवला. भीमा कोरेगाव हिंसाचार हे षड्यंत्र होते, असा दावा करत कोरेगाव-भीमा प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर लगेच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले होते.
वाचा : भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयएची चार्जशीट दाखल, तेलतुंबडे, नवलखा यांच्यासह ८ जणांचा समावेश