पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उजनी जलाशयात मासेमारी करीत असताना येथील मच्छीमाराला नदीकाठावर एक पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याने तत्काळ या पक्ष्याला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या स्वाधीन केले. हा पक्षी रिव्हर टर्न असल्याची माहिती येथील पक्षिमित्र नितीन नगरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती अशी की, पळसदेव काळेवाडी नं. 2 येथील मच्छीमार अंबर भंडारी हे सायंकाळी मासेमारी करण्यासाठी पाण्यात गेले होते.
साधारण 6 च्या दरम्यान किनार्यावर येत असताना त्यांना रिव्हर टर्न (नदी सुरई) या पक्ष्याच्या पंखाला इतर पक्ष्यांनी टोच्या मारून जखमी केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. भंडारी यांनी याची माहिती पत्रकारांना दिल्यानंतर त्यांनी याची माहिती तत्काळ वन विभागाला दिली. यानंतर वनरक्षक एस. टी. कांबळे, पक्षिमित्र नितीन नगरे यांनी हा जखमी पक्ष्याला ताब्यात घेतले. पक्ष्याचा पंख फ्रॅक्चर झाला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर यांच्या मार्गदर्शनानुसार जखमी रिव्हर टर्नला ताब्यात घेऊन उपचारासाठी पुण्याला पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा