Uncategorized

जागतिक पर्यावरण दिन विशेष : सातारा जिल्ह्यातील वनक्षेत्रात १ हजार हेक्टरने वाढ

Pudhari News

सातारा : महेंद्र खंदारे 

2016 मध्ये शतकोटी वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत चार टप्प्यात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानुसार सातारा जिल्ह्यात सुमारे 1 कोटी 70 लाखांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. यामधून गत चार वर्षात जिल्ह्याच्या वन क्षेत्रात 1 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात 12.60 टक्के असणारे जंगल व्याप्‍त क्षेत्र आता 13 टक्के झाले आहे. 

वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्यावाढ व पर्यायाने वाढते असलेले प्रदुषण यांमुळे पर्यावरण व मानवी जीवन प्रभावित होत आहे. पर्यावरणाचा समतोल साधणे हे मानवाच्या अस्तिवास भाग पडले आहे.  एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान 33% इतके क्षेत्र वनाच्छादनाखाली विस्तारीत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 

पहिल्या टप्प्यात 2 कोटी वृक्षारोपणात जिल्ह्यात 5 लाख 88 हजार रोपांची लागवड करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात 4 कोटी वृक्षारोपणात जिल्ह्याला 7 लाख 63 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, वन विभागाने यापेक्षा सरस कामगिरी करत 8 लाख 88 हजार झाडांची लागवड केली. तर 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात जिल्ह्याला 23 लाख झाडे लावण्याचे टार्गेट दिले असताना जिल्ह्यात 29 लाख 79 हजार रोपांची लागवड करण्यात आली. तर 33 कोटी वृक्षलागवडीत जिल्ह्याला 1 कोटी 24 लाख 750 वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 1 कोटी 26 लाख 4 हजार 753 झाडे लावण्यात आली. 

ही वृक्षलागड वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच जिल्हास्तरीय प्रशासकिय यंत्रणा, अशासकिय संस्था, शैक्षणिक संस्था व जनसहभागातून करण्यात आली. 

याचे फलित आता दिसू लागले आहे. चार वर्ष सातत्याने वन विभागासह सर्वच यंत्रणानी आप आपल्या परिने जोमाने वृक्षलागवड केली. यामुळेच जिल्ह्यात या कालावधीत 1 हजार हेक्टरने जंगल क्षेत्रात वाढ झाली आहे. 2017 मध्ये सातारा जिल्ह्यात 1लाख 32 हजार हेक्टरवर जंगल होते. त्याची राज्याची तुलना केल्यास ते 12.60 टक्के होते. तर शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम झाल्यानंतर 4 वर्षात यामध्ये 0.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला आता 1 लाख 33 हजार हेक्टर जंगल क्षेत्र झाले आहे. 

दरम्यान, जंगल वाढवण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला आहे. जेवढे प्रयत्न वाढवण्यासाठी घेतले आहेत ते आता वाचवण्यासाठीही घेणे गरजेचे आहे. ही झाडे वाढवण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च व मेहनत गेली आहे. त्याचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी व्हावा यासाठी ही झाडे वाचवणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे वणवा किंवा वृक्षतोडीवर लगाम घालण्यासाठी यंत्रणा आणखी अलर्ट ठेवावी लागणार आहे. 

हरित सेनेचा जंगल वाचवण्यात मोलाचा वाटा

वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हरित सेना ही नवीन संकल्पना आमलात आणण्यात आली. यानुसार वन विभागाने प्रत्येक क्षेत्रात वनांची काळजी घेणारे व वृक्षलागवडीला हातभार लावणारी हरित सेना उभारण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने मोहिम हाती घेतली. गतवर्षीपर्यंत वन विभागाने हरित सेनेअंतर्गत सुमारे 3 लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी केली आहे. हे नागरिक वन विभागाला आप आपल्या गावांमध्ये जंगल वाचवण्यासाठी मोलाची भुमिका पार पाडत आहे. त्यामुळे शाश्‍वत वनक्षेत्र विकासाला चालना मिळत आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT