मोहोळ : तालुका प्रतिनिधी
अल्लाहचे नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती संपूर्ण जगभरात ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ येथे मानवता संदेश रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक तथा शेवटचे नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदी अरेबियातील मक्का येथे इसवी सन 571 मध्ये झाला होता. त्यांनी अल्लाहच्या आदेशाने जगातील सर्वधर्मियांना इस्लामच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला होता. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला असल्याची इस्लामधर्मीयांची धारणा आहे. त्यामुळे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस मुस्लिमबांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. मोहोळ शहरात देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. यामध्ये शहरातील सर्वधर्मीय बांधव देखील सहभागी होतात.
रविवारी मोहोळ शहरात मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मानवता संदेश रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुस्लिमबांधवांकडून मक्का मदिनाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. हेच या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. ही रॅली कुरेशी मोहल्ला, आदर्श चौक, बागवान चौक, गवत्या मारुती चौक, सिद्धार्थनगर, लोकनेते चौक, नगर परिषद, शिवाजी चौक या मार्गाने काढून कुरेशी मोहल्ला येथे सांगता करण्यात आली. यावेळी मुस्लिमबांधवांनी नारे तकबीर अल्लाहू अकबर, नही छोडेंगे नबी का दामन नही छोडेंगे, रसुल की रहमत मरहबा या घोषणा देऊन मोहोळ शहर परिसर दणाणून सोडला. यावेळी मोहोळ शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी रॅलीचे स्वागत करुन अभिवादन केले. या रॅलीत आबालवृद्धांसह मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.