मुंबई : पुढारी ऑनलाईन
गणेशोत्सवात गंगा गौरी, शंकर यांच्या पूजेला जेवढे महत्व आहे तेवढेच हरितालिकेच्या व्रतालाही महत्व आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत केले जाते. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात. हरितालिका म्हणजे उमा-महेश्वरची पूजा, महादेवासाठी पार्वतीने ही पूजा केली होती असे म्हणले जाते, तेव्हापासून ही प्रथा रूढ झाली. सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात.
वर्षभर जरी सोमवार किव्हा महाशिवरात्रिचे व्रत केले नसले तरी हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यासाठी तसेच युवती आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेचे व्रत करतात.
अशाप्रकारे करतात हरितालिका पूजा
सकाळी नदीवर जाऊन तेथील वाळू आणावी. या वाळूपासून शिवलिंग तयार करावे. शिवलिंगाला दूध, पाणी यांचा अभिषेक करून हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी. त्यानंतर बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात. यात आंबा, औदुंबर, पिंपळ, पळस, आघाडा, केवडा, दुर्वा यांच्यासोबत अनेक फुलांच्या फळांच्या वनस्पती वाहिल्या जातात.
फुलामध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान आहे. फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकरांना अतिप्रिय असते. यानंतर हरितालिकेची कथा वाचावी आणि हरितालिका, शंकराची आरती करून रात्री जागरण करावे. दुसर्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखूवन उपवास सोडावा. महादेव-पार्वतीच्या पूजेचे विसर्जन करावे.