Uncategorized

Holi 2024 : होळी उत्साहात; आज रंगोत्सव

मोहन कारंडे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : शहर उपनगरात रविवारी (दि. २४) होळीचा सण (Holi 2024) पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी गल्लोगल्लीत पूजा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर सामूहिक होलिकादहन करण्यात आले. यावेळी टिमक्या व ढोल वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. सोमवारी (दि. २५) शहरात रंगोत्सव साजरा होणार असून त्याची पूर्वतयारी तरुणाईकडून रविवारपासूनच सुरु होती.

होळीनंतर (Holi 2024) वसंत ऋतुला प्रारंभ होतो. निसर्गातील बदलाचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये आनंद, उत्साहाचा माहोल असतो. बेळगावातही होळी परंपरेनुसार साजरी केली जाते. शहर उपनगरात तरुण मंडळांतर्फे होळी कामण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.  गल्लोगल्ली गोवऱ्या व लाकडे रचण्यात आली होती. तिथे मुलांचे टिमक्या आणि ढोलवादन लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी महिलांनी होळी कामण्णा मूर्तीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. यावेळी गल्लीतील आबालवृद्धांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून पूजा करण्यात आली. होलिकायै नम हा मंत्र म्हटल्यानंतर होळी पेटविण्यात आली.

गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशीलदार गल्ली, चव्हाट गल्ली येथे सामूहिक होळीचे दहन (Holi 2024) करण्यात आले. शहरात आणि पूर्व भागातील गावांमध्ये धूलिवंदनादिवशी रंगोत्सव खेळण्यात येतो. अनगोळ वगळता शहापूर, टिळकवाडी, खासबाग, वडगावात पाच दिवसानंतर रंगपंचमी साजरी करण्यात येते. सोमवारी पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी ९.३० ते २ यावेळेत व्हॅक्सिन डेपो मैदानावर 'होळी मिलन' या सामूहिक रंगोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारीही शहर बाजारपेठेत रंग, पिचकाऱ्या, मुखवटे खरेदीची लगबग होती.

जलतुषार बसविण्याची लगबग

सोमवारी होणाऱ्या रंगोत्सवाची (Holi 2024) तरुणाईला मोठी उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोष पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने पाण्याची नासाडी टाळून कोरड्या रंगाचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी विविध ठिकाणी उंचावर जलतुषार यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे, रंगात भिजत तरुणाई थिरकणार आहे. काही तरुण मंडळांनी ग्रामीण भागातून टँकर मागवले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT