Uncategorized

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस; यंत्रणा अ‍ॅलर्ट

Pudhari News

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

हवामान खात्याने सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड आणि मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणा अ‍ॅलर्ट झाली आहे. मात्र, सकाळच्या सत्रात ऊन पडले होते. परंतु, दुपारनंतर मात्र जिल्ह्याच्या अनेक भागांत धुवाँधार पाऊस झाला. अतिवृष्टी नसली तरी पावसाचा जोर मात्र वाढलेला दिसला. त्यामुळे नदी, नाले चांगलेच प्रवाहित झाले आहेत. सायंकाळी काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. 

यावर्षी मान्सूनने महाराष्ट्रात लवकर एंट्री घेतली; मात्र तो मोठ्या प्रमाणावर बरसणार कधी, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारपासून चार दिवस कोकणसह मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी, रायगड आणि मुंबईत रेड अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथकही सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. या पथकाने शनिवारी कुडाळ, सावंतवाडी भागात पाहणी केली. ज्या ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसतो अशा सर्व ठिकाणांचा या पथकाने आढावा घेतला. मात्र, शनिवारी सकाळच्या सत्रात ऊन पडले होते. एखाददुसरी सर लागली. मात्र, दुपारनंतर मेघ दाटून आले आणि काही ठिकाणी संततधार आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कणकवली, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यात सायंकाळच्या सत्रात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. 

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रविवारपर्यंत जिल्ह्यांतर्गत एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक फेर्‍या सुरू होत्या. तर महावितरणनेही आवश्यक ती खबरदारी घेत आपली यंत्रणा अलर्ट केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने महावितरणचे मोठे नुकसान झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भाग जवळपास आठवडाभर अंधारात होता. अथक प्रयत्नांती हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. मात्र पुन्हा अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे महावितरणने आवश्यक ती खबरदारी घेत आपल्या कर्मचार्‍यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 40.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 218.0360 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.74 टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 37.6150, अरुणा – 18.3307, कोर्ले- सातंडी – 18.2630 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.2810, नाधवडे – 2.1354, ओटाव – 1.1850, देंदोनवाडी – 0.5732, तरंदळे – 0.8410, आडेली – 0.2540, आंबोली – 0.9660, चोरगेवाडी – 0.9960, हातेरी – 0.7420, माडखोल – 1.6900, निळेली – 0.5160, ओरोस बुद्रुक – 0.9120, सनमटेंब – 0.3880, तळेवाडी – डिगस – 0.0960, दाभाचीवाडी – 0.7070, पावशी – 1.4120, शिरवल – 0.8280, पुळास – 0.8210, वाफोली – 0.4290, कारिवडे – 0.4060, धामापूर – 0.6910, हरकूळ – 1.5710, ओसरगाव – 0.0150, ओझरम – 0.4050, पोईप – 0.0920, शिरगाव – 0.2760, तिथवली – 0.5040, लोरे – 0.3280 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा

 

SCROLL FOR NEXT