रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
9 ते 12 जुलै या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. आठवडाभराच्या ब्रेकनंतर गुरुवारी पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. दरम्यान, 10 जुलैपासून पाऊस पुन्हा दमदार सुरुवात करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी पाऊस जून महिन्यात अतिवृष्टीने सक्रिय झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ब्रेक घेतला होता. गेले अनेक दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती.
पावसाने गुरुवारी पुन्हा सरींची मालिका सुरू केली. मात्र, त्यामध्ये जोर नव्हता. ऐन लावणीच्या काळात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. गुरुवारी सुरू झालेल्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खोळंबलेल्या भातलावण्या मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 14.92 मि.मी. तर एकूण 134.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 22.30 मि.मी., दापोली 22.30 मि.मी., खेड 20.40 मि.मी., गुहागर 11.60 मि.मी., चिपळूण 6.90 मि.मी., संगमेश्वर 8.90 मि.मी., रत्नागिरी 10.20 मि.मी., राजापूर 20.70 मि.मी.,लांजा 11 मि.मी. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती निरंक आहे.