Uncategorized

कराड तालुक्यात अतिवृष्टी; कृष्णा-कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

Pudhari News

कराड ः पुढारी वृत्तसेवा 

कराड तालुक्यात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. रात्रभर धो-धो पाऊस कोसळत होता. या पावसामुळे कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. 

कराड तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे कराड 95, मलकापूर 93, सैदापूर 90, कोपर्डे हवेली 98, मसूर 75, उंब्रज 85, शेणोली 88, कवठे 82, काले 80, कोळे 87, उंडाळे 85, सुपने 99, इंदोली 88. 

एक जूनला ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर कराड मलकापूर परिसरात अक्षरश: दाणादाण उडाली होती. मात्र, यातून धडा न घेता गांधारीची भूमिका घेण्यात आल्याने गोटे गावच्या हद्दीत पुणे – बंगळूर आशियाई महामार्ग पाण्याखाली गेला. 

 गोटे, वनवासमाची गावाच्या बाजूने येणार्‍या ओढ्याचे पाणी सेवा रस्त्यासह महामार्गावर साचले. त्यामुळे महामार्गावरून केवळ अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. दुचाकी तसेच लहान वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आली होती.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस  पहाटेपर्यंत कोसळत होता. जोरदार पावसामुळे गोटे हद्दीत आशियाई महामार्गावर पाणी साचले होते.  सुरक्षेच्या कारणासाठी काही काळ सर्व वाहतूक ठप्प होती. 

ओगलेवाडी चौपदरी रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या पाण्यातून वाट काढत वाहनांची ये-जा सुरू होती. तालुक्यात सर्व भागात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. खोडशी बंधरा भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री टेंभू प्रकल्पाचे दरवाजे उचलून पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे कोरेगाव येथे स्मशानभूूमीपर्यंत पाणी वर आले होते. टेंभू प्रकल्प विभागाने पाणी सोडण्याबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असे नागरिकांनी सांगितले. 

या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात  पाणी साचले असून खरीपाची  कामे ठप्प झाली आहेत. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT