Uncategorized

बेळगाव जिल्हा जलमय | पुढारी

Pudhari News

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणार्‍या पावसामुळे आणि महाराष्ट्रातून वाढत्या प्रवाहामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या प्रवाहित झाल्या असून पाच पूल पाण्याखाली गेले आहेत. मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून शहरात मात्र दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. सलग तीन दिवस संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदी पात्राबाहेर पडली आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यात तीनशे दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस उचगाव परिसरात नोंदवला गेला आहे. अजून दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास नदीकाठच्या शिवारात पाणीच पाणी होण्याची भीती शेतकर्‍यांना आहे.

घरांची पडझड, झाडे कोसळली

संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले असून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

ग्रामीण भाग अंधारात

पावसामुळे ठिकाणी झाडे कोसळल्याने असल्यामुळे बुधवारी दुपारपासूनच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित केला होता. अनेक ठिकाणी खांब कोसळले आहेत; पण हेस्कॉमच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून गुरुवारी संध्याकाळी वीजपुरवठा सुरळीत केला.

शहरात ऊन-पावसाचा खेळ

जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत नसला तरी बेळगाव शहरात मात्र दुपारपर्यंत ऊन-पावसाचा खेळ दिसून आला. सकाळी दहा वाजता पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. पुन्हा ऊन, पाऊस असा खेळ संध्याकाळपर्यंत सुरू होता.

नद्या दुथडी

जिल्ह्यात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे आणि महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाहामुळे जिल्ह्यातील पाच पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामध्ये चिकोडी तालुक्यातील चार आणि हुक्केरी तालुक्यातील एका पुलाचा समावेश आहे. महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे कृष्णा, वेदगंगा, दूध गंगा आणि हिरण्यकेशी या नद्यांत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील जत्राट-भीवशी, अकोळ-सिदनाळ आणि कारदगा-भोज हे पूल पाण्याखाली गेले आहेत. हिरण्यकेशी नदीवरील संकेश्‍वर-नागनूर हा पूलही पाण्याखाली गेला आहे.

मार्कंडेय नदी पात्राबाहेर

उचगाव : पुढारी वृत्तसेवा 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे भात पिकाचे नुकसान होण्याचा संभव आहे. कित्येक वर्षांच्या इतिहासात प्रथमच मार्कंडेय नदी जून महिन्यात पात्राबाहेर पडली आहे. उचगाव, कल्लेहोळ, आंबेवाडी, मन्‍नूर, गोजगा, तुरमुरी, बाची, बसुर्ते, कोनेवाडी आदी नाल्यांना भरपूर पाणी आल्याने नदी पात्राबाहेर आली आहे.

राकसकोप जलाशयात सव्वातीन फुटांची वाढ

बेळगाव :  जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशयाची पाणीपातळी सव्वा तीन फुटाने वाढली आहे. राकसकोप पाणलोट प्रदेशात जोरदार पाऊस पडल्याने या काळात मोठ्या प्रमाणात पाणी जलाशयात जमा झाले आहे. गुरुवारी सकाळी धरणातील पाण्याची पातळी 2457.50 फूट इतकी असून गत वर्षी आजच्या दिवशी 2554.80 फूट इतकी होती. तीन दिवसांच्या पावसाने सव्वा तीन फुटांनी वाढली असल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या पाणीसाठ्याची पातळी ओलांडली आहे. या परिसरात आतापर्यंत 110.9 मि.मी. पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT