Uncategorized

रेशनकार्ड अपडेट केले तरच मिळणार धान्य

Pudhari News

बेळगाव : प्रतिनिधी

पाच वर्षाचा कालावधी उलटून गेलेली रेशनकार्ड पुन्हा अपडेट करण्याचा सल्ला रेशनदुकानदार ग्राहकांना देत आहे. नवीन रेशनकार्ड आधारकार्डच्या आकारात मिळत आहे. रेशनकार्ड अपडेट केले तरच पुढच्या महिन्यात रेशन मिळेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे रेशनकार्ड अपडेट करण्यासाठी सायबर कॅफेत गर्दी होत आहे. सकाळी 10.30 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्व्हर सुरू असते. त्याच काळात नागरिकांना रेशनकार्ड अपडेट करावे लागत  आहे.

बीपीएल कार्ड सर्व्हे करण्याचे कामदेखील सुरू आहे. जिल्ह्यात हजारो नागरिकांनी बीपीएल कार्ड स्वत:हून परत केली आहेत. पाच वर्षाहून अधिक काळ झालेली रेशनकार्ड अपडेट करण्याचा सल्ला रेशनदुकानदार देत आहेत. रेशनकार्डवरील सदस्यांचे आधारकार्ड  जमा करण्याचे कामदेखील सुरु आहे. त्यामुळे रेशनुकानचालकांना रेशन वितरणाबरोबर आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स, संपर्क नंबर याची माहिती जमा करावी लागत आहे. 

नवीन सदस्याचे रेशनकार्डमध्ये नाव नोंद करण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे. संबंंधिताचे आधारकार्ड व उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत आहे. अपत्याचे नाव नोंद करावयाचे असल्यास जन्मदाखला, वडिलांचा रहिवासी दखला गरजेचा आहे. रेशनकार्डमध्ये नाव नोंद करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला सक्तीचा केला आहे. तो मिळण्यासाठी किमान 15 दिवसाचा अवधी लागत आहे.

एजंटांकडून नागरिकांची लूट

रेशनकार्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. सदर दाखला चार दिवसात मिळवून देतो म्हणून एका प्रमाणपत्रामागे 400 रुपयाची मागणी एजंट करत आहेत. मात्र प्रत्यक्षात सदर प्रमाणपत्र 12 ते 14 दिवसांनीच देण्यात येत आहे. सायबर कॅफेमधील कर्मचारी व एजंट यांच्या संगनमताने नागरिकांची लूट होत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन मिळण्याची सोय आहे. मात्र तो कसा मिळवावा, याचे ज्ञान नसल्याने नागरिकही एजंटांना पैसे देत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

उत्पन्न दाखल्यासाठी 180 खर्च

जात व उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी एकूण 180 रु. खर्च येतो. मात्र एजंट  400 रु. उकळत आहेत. आधारकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड झेरॉक्स, जात व उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी 150 रु. खर्च येतो.  अर्ज तहसीलदार कार्यालयात जमा केल्यानंतर त्या ठिकाणी 30 रु. भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर त्या पावतीवर तुम्हाला प्रमाणपत्र कधी मिळणर, याचा उल्लेख केलेला असतो. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT