Uncategorized

गणेशउत्सव2020 – पुण्यातील मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती

Pudhari News

कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून, मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायिका आहे. शहाजी राजे यांनी लालमहाल बांधला. त्यावेळी राजमाता जिजामाता यांनी मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.


पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. शहाजी राजांनी (शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा जिजामाता यांनी या मूर्तीची स्थापना केली होती. त्यांना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली होती असे म्हंटले जाते. आज याच गणपतीला विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. जेव्हा 1893 लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. त्याचवर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली.

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे 128 वर्ष आहे. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासूनच कसबा गणपती प्रसिद्ध आहे. या गणपती मंदिराच्या जवळील लाल महालामध्येच शिवरायांचे बालपण गेले आहे. लोकमान्य टिळक यांनी उत्सवाला सुरुवात केल्यानंतर ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीलाच अग्रस्थान दिले गेले. गेल्या 127 वर्षांच्या काळात कसबा गणपती मंडळाने सातत्याने या बदलत जाणार्‍या उत्सवाचे नेतृत्व केले आहे. अगदी भीषण दुष्काळामध्ये पारंपरिक स्वरूपात नदीत गणेशमूर्ती विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करण्याचा निर्णय सर्वप्रथम कसबा गणपती मंडळानेच घेतला होता आणि त्यानंतर इतर मानाच्या मंडळांसह बहुतेक मंडळांनी त्याचे अनुकरण केले. मानाचा गणपती असूनही पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे.

वेगळ्या स्वरूपाचा देखावा-सजावट न करता साधी आणि नेटकी सजावट हे मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे वैशिष्ट्य आहे. अनेक मंडळांकडून गणेश उत्सवाव्यतिरिक्त वर्षभर विविध उपक्रम/कार्यक्रम घेण्यात येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ मंडळाकडून साखर वाटप केले जाते. त्याऐवजी, सामाजिक उपक्रमांवर मंडळ भर देत आले आहे. नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी हे गाव मंडळाने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याप्रमाणेच त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी इतर सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पहिल्यापासूनच वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ कसबा गणपती मंडळाने केला आहे. उत्सवाच्या आयोजनामध्ये आणि एकूणच सर्व प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मंडळाने उत्सवात महिला दिवस असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या दिवशी उत्सवाची सकाळी सहापासून ते रात्रीपर्यंत उत्सवाची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे असते. सनई वादनापासून ते पूजा-आरती आणि सर्वांच्या स्वागताची जबाबदारी महिलांकडे दिली जाते. उत्सवामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात पुढाकार घेतल्यानंतर विश्वस्तांमध्येही दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT