मुंबईचा राजा म्हणून सुप्रसिद्ध असलेले लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ आहे. मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे. उंच मूर्ती आणि भव्य-दिव्य प्रतिकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईचा राजा हे मंडळ एका दिवसात नावलौकिक कमावलेले मंडळ नाही. त्यामागे स्वातंत्र्य चळवळीचा मोठा इतिहास आहे.
मुंबईतील लालबाग,परळ, शिवडी, वरळी हा आजही गिरणगाव म्हणून नामांकित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील लालबाग परिसरात गणेश चतुर्थीस लागणाऱ्या पूजा साहित्यासह गणेश मुर्ती, दसरा-दिवाळीसाठी लागणारे साहित्य आणि मसाला खरेदीसाठी मोठया प्रमाणात मराठी माणसाची वर्दळ असायची. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने लोकांमध्ये जागृती आणि एकजुटीसाठी विभागातील काही कार्यकर्त्यांनी सन १९२८ साली पेरुची चाळ येथे 'लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळ' स्थापन केले. प्रथम पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजन, किर्तन, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असे. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. पुढे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला. उत्सवाचे स्वरुप व त्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन त्याच बरोबर वाढत्या लोकवस्तीचे प्रमाण विचारात घेऊन कै. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७-३८ साली हा उत्सव गणेशगल्लीे परिसरात म्हणजेच आत्ता जेथे जागेचे देवस्थान आहे तेथे आणला.
गणेशोत्सव गणेश गल्लीत स्थलांतरीत झाल्यानंतर कार्यक्रमांची रुपरेषा पाहून तो अकरा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. १९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्व प्राप्त होऊन या उत्सवाच्या माध्यमातुन स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे मंडळातर्फे उभारले जाऊ लागले. त्यामुळे हा उत्सव लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीची भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली तर मंडळाने सुभाषचंद्र बोस यांच्यारुपात उभारलेली "श्री"ची मूर्ती आणि सात घोड्यांचा स्वराज्याचा सूर्य हा देखावा तर लोकांना ऊर्जा देऊन गेला. त्यावर्षी लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मूर्तीचे विसर्जन तब्बल ४५ दिवसांनी करण्यात आले. या देखाव्याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे मूर्तीसमोर सादर करण्यात आले. या सर्व कलाकृतींना चांगली प्रसिध्दी मिळाली आणि लालबागच्या गणेशगल्ली येथील उत्सवाला लोकांची गर्दी होऊ लागली. १९५०-५१ या काळात उत्सव मंडळाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली. त्यावेळी मंडळाची किमान वर्गणी फक्त आठ आणे करण्यात आली. उत्तम सजावट व आकर्षक मुर्तीसाठी नावलौकिक मिळविलेले गणेशगल्ली येथील देखावा पहाण्यासाठी संपुर्ण मुंबापुरी लोटू लागली आणि हा उत्सवाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला.
मंडळाने १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनविली व लालबाग हे नाव जगविख्यात केले. अमृतमहोत्सवी वर्षानंतर २२ फुटी उंच गणराया सोबत आकर्षक सजावट हे मंडळाचे समिकरण बनून गेले. देशातील विविध तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांच्या प्रतिकृतीचे भव्य-दिव्य देखावे उभारण्यास मंडळाने सुरुवात केली आहे. मदुराईचे मिनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालय-केदारनाथ मंदिर आणि म्हैसुरचे चामुंडेश्वरी मंदिर हे देखावे आजही भाविकांच्या मनात घर करून आहेत. लाखो भाविक दरवर्षी मुंबईच्या राजा चरणी दर्शनासाठी गर्दी करतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा प्रथमच भाविकांची गर्दी टाळण्यासाठी उंच मूर्ती आणि भव्य-दिव्य देखावा उभारण्याची परंपरा मंडळाला खंडीत करावी लागली. मात्र देशसेवेचे व्रत मंडळाने सोडलेले नाही. रक्तदान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, आरोग्य शिबिरांद्वारे सामाजिक कार्याची परंपरा अखंडपणे तेवत ठेवण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.
असा झाला गणेशगल्लीचा गणराज मुंबईचा राजा
२००४ साली मंडळाने आपल्या गणेशाची ख्याती जन मानसात तसेच भक्तांच्या मुखी सहज रहाण्यासाठी गणेशगल्लीच्या गणराजाला "मुंबईचा राजा" असे प्रचलीत करण्याचा ठराव केला. एका दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करून मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत माजी अध्यक्षांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले.
विसर्जन मिरवणणुकीचा पहिला मान मुंबईच्या राजाचा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत हजारो विसर्जन मिरवणुका निघतात. मात्र मुंबईतून विसर्जनासाठी निघण्याचा पहिला मान हा मुंबईच्या राजाचा असतो. त्यानंतर इतर मंडळे लालबागमधून गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. ढोल – ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि लाखो भाविकांचा जनसमुदाय हे हया विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असते.
कोरोनाशी दोन हात करताना
यावर्षी कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले होते. अशा परिस्थितीत विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक भार न टाकता वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजातर्फे सर्वप्रथम घेण्यात आला.
याशिवाय मुंबईच्या राजातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त करण्यात आला.
मदतीचा ओघ कधीच थांबत नाही
ऑगस्ट २०१९मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरांत आलेल्या महापुरावेळी मंडळाने पूरग्रस्त नागरिकांना ३ लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.जुलै २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील अपघातग्रस्त कुटुंबियांना मंडळाने पाच लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.
१९८१ ते ९० अशी सलग १० वर्षे पनवेल येथील जांभुळ पाडा या आदिवासी वस्ती असलेल्या गावाला पुराचा भयंकर तडाका बसला. त्यांचे संपुर्ण जनजीवन विस्कळत झाल्याने त्यांच्या हाकेला धावून जात मंडळाने तातडीने मदत कार्य सुरु केले. जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी वाटप करुन विस्कळीत झालेले त्यांचे जीवन पुन्हा एकदा स्थिरस्थावर करण्यात मंडळाचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर कारगिल युध्दावेळी सरकारने केलेल्या आवाहनानुसार मंडळाने एक लाख रुपये कारगिल रिलीफ फंडासाठी दिले होते.
२६ जुलै २००७ साली महाड – चिपळुण तालुक्यांत झालेल्या महापुरानंतर तेथील शालेय विद्यार्थ्यांना वहया, पुस्तके, दप्तर, गणवेश व इतर शालोपयोगी साहित्यांचे वाटप मंडळाने केले. तसेच दासगाव, जुई, चिपळुण या गावांमध्ये सातत्याने मदत कार्य सुरु ठेवले.याशिवाय केईएम रुग्णालयात स्ट्रेचर व व्हील चेअरसह दरवर्षी रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. गेली १५ वर्षे सलग मंडळातर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले जात असून त्यात सुमारे एक ते दीड हजार रक्तदाते रक्तदानाचे कार्य पार पाडतात. विभागात आणि ग्रामीण व दुर्गम भागातही आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि मोफत चष्मा वाटप व मोतीबिंदु शस्त्रक्रियेचे आयोजन मंडळ करते.
शालेय विद्यार्थांना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देऊन त्यांचा सन्मान केला जातो. वर्षानुवर्षे या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मंडळाने वाढ केली आहे. इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थांचाही मंडळातर्फे विशेष सत्कार केला जातो.