पणजी : प्रतिनिधी
भारतीय न्याय अहवालानुसार, सामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या व्यवस्थेत देशातील लहान राज्यांमध्ये गोव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशात मोठ्या राज्यांच्या वर्गात महाराष्ट्र राज्याने पहिले स्थान मिळवले असून त्यापाठोपाठ केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा राज्यांचे क्रमांक लागतात.
देशातील सात लहान राज्यांत गोव्याला पहिले स्थान तर सिक्कीम, हिमाचल प्रदेशला अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त झाले आहे.
'टाटा ट्रस्ट'तर्फे दरवर्षी न्यायिक व्यवस्था, पोलीस, तुरुंग आणि कायदेशीर मदत या चार मानांकनावर आधारीत सर्व राज्याचा अहवाल तयार केला जातो. या चारही क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतूद, मनुष्यबळ, विविधता, कामाचा बोजा, साधनसुविधा आदी गोष्टींचा विचार केला जातो. याविषयी कोणतेही खासगी संस्थेकडच्या माहितीचा आधार न घेता सरकारी अधिकृत माहितीवर विसंबून अहवाल बनवला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.