मुंबई : पुढरी ऑनलाईन
राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाला सुपर न्युमररी न्यायाने जागा द्या, अशी मागणी केली आहे.
न्यायालायात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण सर्वोच्च न्यायालायाच्या निकालापुढे आम्ही बोलू शकत नाही. न्यायालयाच्या निकालाचा आदर आहे. मात्र, मराठा समाजासाठी आजचा दिवस हा दुर्दैवी असल्याचे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.
तसेच, राज्याने आणि केंद्र सरकारने यांसदर्भात मिळून चर्चा करावी. आणखी काही मार्ग निघतो का? हे चर्चेतून पाहावे. इतर राज्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाते. मात्र, इथे हा कायदा रद्द करण्यात आला याची खंत वाटते, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. यासोबतच सुपर न्युमररी हा पर्याय मला शेवटचा वाटतो. त्यामुळे मराठा समाजाला सुपर न्युमररी न्यायाने जागा द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, उद्रेक हा शब्द काढू नका सध्या कोरोनाचा काळ आहे. सयंम बाळगा असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.