Uncategorized

GANG’S of दगडी चाळ! कशी तयार झाली अरुण गवळी उर्फ डॅडीची गॅंग? 

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क

"बंदुकीनं मारणं ही फार मोठी गोष्ट नाही, एखाद्याला चाकूनं भोकसणं याला डेरींग लागते. दुरुन कोणीही कितीही जणांना बंदुकीने मारू शकेल. पण, चाकूनं एखाद्याची हत्या करण्यासाठी टार्गेटला जवळ जाऊन भिडावं लागतं. त्याच्या मरणाचा सौदा करावा लागतो. भर चौकात सर्वांसमोर सपासप टार्गेटवर वार करावे लागतात. नंतर पोलिसांपासून स्वतःला वाचविण्यासाठी सतत दूर पळावं लागतं. जास्त पोलिसांपासून दूर पळता येत नाही, कारण कुणा ना कुणीतरी आपली टीप पोलिसांना देतं आणि आपला गेम होतो", हे शब्द आहेत एका सराईत आणि निढर गुन्हेगाराचे! अशा गुन्हेगारांचा बादशाह दुसरा-तिसरा कोणी नाही, तर प्रशासनात कुख्यात आणि सामान्यांच्यात विख्यात असणाऱ्या डॅडी उर्फ अरुण गवळी आहे. त्याची अख्ख्या मुंबईत दहशत निर्माण झाली ती दगडी चाळ अखेर पाडली जाणार आणि तिथं ४० मजली इमारत उभा राहणार आहे, त्यामुळे जेल हवा खाणारा डॅडी पुन्हा चर्चेत आला आहे. पाहूया त्याच्या प्रवासाविषयी…

गवळीचा शूटर, बाॅडीगार्ड आणि अत्यंत विश्वासू माणूस असणारा व्यक्ती नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतो की, "१९८७ साली गॅंगमध्ये सामील झालो. तेव्हा ही टोळी बाबू रेशीम, रामा नाईक आणि अरूण गवळी, या तिघांच्या आडनावाने 'बीआरए' या नावाने ओळखली जात होती. मात्र, त्याच वर्षी बीआरए गॅंगला ठस्सन देणाऱ्या टोळीनं बाबू रेशीमची हत्या केली. रामा नाईकदेखील एका चकमकीत ठार झाला. त्यामुळे अरुण गवळी एकमेव नेता उरला." मुंबईच्या गुन्हेगारीविश्वाला आतून ओळखणारे म्हणतात की, "रामा नाईक आणि बाबू रेशीम जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत बीआरए गॅंगचं नेतृत्व त्यांनी केलं. शहरातील त्यांची सक्रीयता जास्त होती." 

सुरुवातील बीआरए गॅंग ही इतर टोळ्यांना एखाद्या गुन्ह्यासाठी माणसं पुरविण्याचं काम करत होती. यामध्ये खुद्द दाऊद इब्राहिमही त्यांची मदत घ्यायचा. खंडणीसाठी गिरणगाव आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्याने बीआरएची मदत घेतली. बीआरएच्या गुन्हेगारीतील सक्रीयतेमुळे बाबू रेशीम आणि रामा नाईक सतत बातम्यांमधून झळकत होते. यामध्ये अरूण गवळी फारच कमी दिसायचा. गवळी बहुदा बीआरए गॅंगमध्ये लहान होता, म्हणूनच तो मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये पुढाकार घेण्यास कचरत होता. पण, ज्यावेळी रामा नाईक आणि बाबू रेशीम यांची हत्या झाली. त्यावेळी बीआरए गॅंग मागे-मागे पडू लागली. दोघांच्या मृत्यूनंतर गवळीचीदेखील हत्या होणार, ही गोष्ट सिद्ध झाली होती. आता गवळीला स्वतःच्या सरक्षणासाठी नवी गॅंग तयार करणं गरजेचं बनलं. त्याने नवी गॅंग तयार केली आणि त्यात नवीन माणसं घेतली. त्यात नव्या गॅंगमध्ये गवळीचा नवा शूटरही होता. 

गवळीचा शूटर असं सांगतो की, "मीही वाचविण्यासाठी पळून आलो होतो. कारण, एलआयसी ऑफिसमध्ये काम करत होतो. त्यावेळी एकाशी जोरदार भांडण झालं होतं. त्यात मी त्याचा खून केला होता. सहाजिकच मीही इतरांच्या टार्गेटवर होतो. त्यावेळी अरुण गवळीने मला संरक्षण दिले आणि त्याच्या गॅंगमध्ये सामील करून घेतले. दरम्यान, अरुण गवळी राॅबीन हूड झालेला होता. दगडी चाळीतील लोकांचा कर्ताधर्ता झालेला होता. आसपासच्या भागातील लोक गवळीकडे आपल्या अडचणी सोडविण्यासाठी येऊ लागले होते."

१९८२ साली मोठा गिरणी संप सुरू झाला होता. गिरण्या बंद पडल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात तरूण कामगार बेरोजगार झाले. बहुतेक जणांनी गुन्हेगारीविश्वात प्रवेश केला. नेमकं याचवेळी गवळीने आपल्या गॅंगमध्ये सामील झालेल्यांना पगार देण्याची पद्धत सुरू  केली होती. इतकंच नाही, त्याच गॅंगमध्ये काम करत असताना एखाद्याला अटक झाली किंवा हत्या झाली तर, तो त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतदेखील देत असे. त्यामुळे अरुण गवळी हा तेथील लोकांचा तारणहार ठरला. परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविणे, मुलांच्या शाळेतील प्रवेशासंबंधीच्या अडचणी सोडविणे, इतक्या लहान-लहान समस्या तो सोडवू लागला. दगडी चाळीच्या अंगणात तो दरबार भरवू लागला. लोकांच्या लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या समस्या तो सोडवू लागला. यामुळे अरुण गवळीला लोकांचा मोठी पाठिंबा मिळाला. जेव्हा तो सत्तेत आला, त्यावेळी दगडी चाळचं सरंक्षण वाढलं. 

आग्रीपाडा परिसरात दगडी चाळ आहे. १९९७ अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष अरूण गवळीने काढला, त्याचं कार्यालय दगडी चाळीत आहे. आता ही चाळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्षाची जागा म्हणून ओळखली जात आहे. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईतील चाळी या सामान्य चाळीच होत्या. म्हणजे रुंद पायऱ्या, उंच छप्पर आणि सलगपणे असलेल्या खोल्या, असंच दगडी चाळीचही रुप होतं. नंतर मात्र, गुन्हेगारांना लपविण्यासाठी आणि तेथून निसटून दुसरीकडे जाण्यासाठी त्या चाळींनाही बाजूने मोठ्या भिंती आणि जमिनीलगतच्या अरुंद खोल्या बांधल्या गेल्या. पण, १९८७ नंतर मुंबईतील परिस्थिती बदलली. मुंबई पोलिस आणि गॅंगस्टर्स यांच्या युद्धच सुरू झालं. मुंबई पोलिसांना या गॅंगस्टर्सना मारण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गवळीची गॅंग पोलिसांपासून वाचण्यासाठी चाळीतच लपून राहिली.

पोलिसांची कारवाई इतकी वाढली की, पोलिस सरळ चाळीत घुसू लागले. पोलिस चाळीत आले की, चाळीतल्याच लोकांच्या पाठिंब्याने बेडखाली, स्वयंपाकघरात गळवीचे लोक लपून राहू लागले. गवळीचा शूटर असं सांगतो की, "एकदा पोलिसांच्या भितीने मी सफाई कामगार होऊन दोन बाथरूमची सफाई करत होतो. दुसऱ्यावेळी कसाई झालो होतो, त्यावेळी मी तीन तास कोंबड्यांना कापत बसलो होतो. जेव्हा गवळी तुरुंगात गेला तेव्हा त्यावेळी त्यांची पत्नी आशा गवळीने कामकाज पाहिले. १६ वर्षाच्या जुबेदा मुजावर असताना अरुण गवळीने तिच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर धर्मांतर झाले आणि तिचे नाव आशा असे ठेवण्यात आले. अरुण गवळीची मुलगी गीता गवळी सांगते की, "आम्हा भावंडांना उघड्यावर खेळायची परवानगी नव्हती." 

९० च्या दशकात गवळी जमीन खरेदी-विक्रीची व्यवहार करत होता. त्याच्याकडे हे काम करण्यासाठी सुमारे ३०० लोक कामाला होते. त्यातील बहुतेक सर्वजण सराईत गुन्हेगार होते. गवळीचा शूटर सांगतो की, "त्यावेळी बंदुक सहजपणे उपलब्ध होत नसे. पैसेही कमी असत, त्यामुळे बंदुकदेखील कमीच होत्या. गॅंगमध्ये २० जण शूटर होतो. आमच्या २० जणांमध्ये एकच बंदुक वापरत होतो. बंदुकीसाठी आळीपाळीने नंबर लावून ठेवावे लागत आम्हाला. त्यामुळे एखाद्याची हत्या करण्यासाठी आम्हाला तलवारी आणि चाकू वापरावा लागत असे. आमची वाढती दहशत पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या गॅंगला 'आमची मुलं' म्हणून संबोधत दाऊद इब्राहिमविरोधात आम्हाला उभं केलं. नंतर गवळी आणि ठाकरे यांच्या वाद झाले. १९९७ साली गवळीने स्वतःता राजकीय पक्ष सुरू केला. तो पक्ष अजूनही आहे. जवळजवळ गवळीची गॅंग पोलिसांच्या रडारवर आली होती. राजकारणच त्यांना वाचवू शकत होतं."

मात्र, अरुण गवळी अशा परिस्थितीतही तग धरून राहिला. २००८ मध्ये त्याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र, ३ वर्षांनंतर जामीनावर त्याची सुटका झाली. पुन्हा २०१२ मध्ये त्याला शिवसेनेचा नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळी दोषी आढळला आणि त्याला पुन्हा अटक करण्यात आली. अशा सगळी पार्श्वभूमी असतानाही २००४ च्या निवडणुकीत ९० हजारांच्या फरकाने निवडून आला. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच उभा राहिला. कारण, ज्याचा शोध सुरू होता, त्याचे संरक्षण करण्याचे काम पोलिसांवर आले. तरीही आतपर्यंत गवळीच्या गॅंगमधील ११ शूटर्सचा पोलिसांनी खात्मा केलेला होता. इन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांची महत्वाची भूमिका होती. साळसकरांची गवळीला जास्त भीती होती. २००४ च्या निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदानाला मी बाहेरत पडणार नाही, असं गवळीनं सांगितलं होतं. कारण, गवळीच्या परिसरात साळसकर होते. त्याला भीती होती की, विजय साळसकर त्याचा इन्काऊंटर करेल. तो पत्रकारांना म्हणाला होता की, "वो येडा अधिकारी मेरा खून कर देगा."

अरुण गवळीचा हा विश्वासू शूटर सांगतो की, "आम्ही गुन्हे करीत असताना एक नियम केला होता की, सामान्य-गरीब लोकांना कोणताही इजा करायची नाही. श्रीमंत, माफिया, राजकारणी आणि पोलिसांना ठार मारा, पण सामान्यांना मारू नका, असा नियम होता. आज रोजी गवळीच्या गॅंगमधील माझे काही ९० हून अधिक सहकारी मारले गेले, तर काही वाचले. दरम्यान, गवळीला राजकारणाची ताकद कळली आणि तिथंच काम करायचं, असं ठरवलं. आम्हाला छोटा राजन, दाऊद इब्राहिमसारखे बाहेर पळून जाण्याची संधी नव्हती. आम्ही स्थानिक मुलं होतो. याच शहरात आम्ही मोठे झालो. हे शहर सोडले नाही. त्यामुळेच पळून न जाणारा 'डॅडी' म्हणून अरुण गवळी आपली विशेष ओळख निर्माण करू शकला."  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT