Uncategorized

‘हनी ट्रॅप’ने लुटणारी टोळी जाळ्यात; सातजणांना अटक

Pudhari News

बेळगाव : प्रतिनिधी

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकांतातील क्षणांची व्हिडीओ क्‍लीप तयार करून 'हनी ट्रॅप'द्वारे ब्लॅकमेलिंग करणार्‍या सातजणांच्या टोळीला मार्केट पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

मनोज भरमा पाटील याने मार्केट पोलिस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली. एका वृत्तपत्राच्या पत्रकारासह कन्‍नड संघटनेच्या म्होरक्याचाही संशयितांमध्ये समावेश आहे.

विद्या ऊर्फ सारिका पांडुरंग हवालदार, दीपा संदीप पाटील (दोघीही रा. महाद्वार रोड, दुसरा क्रॉस), मंगला दिनेेश पाटील (रा. कोरे गल्‍ली, शहापूर), मनोहर अप्पासाब पायकण्णावर (रा. हलगा), नागराज रामचंद्र कडकोळ (रा. देवराज अर्श कॉलनी बसवनकुडची), सचिन मारुती सुतगट्टी (रा.सह्याद्रीनगर), महम्मदयुसूफ मिरासाब कित्तूर (रा. इटगी, ता. खनापूर) अशी अटक करण्यात  आलेल्यांची नावे आहेत. 

या टोळीतील म्होरक्यांकडून धनिकांचा शोध घेऊन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात होते. टोळीतील महिलांची ओळख करून दोघांमध्ये संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यानंतर दोघांचे एकांतातील क्षण चित्रीत करून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग  करण्यात येत होते. शहरातील मनोज यांच्याकडे 50 हजारांची मागणी केली होती. त्याला धमकी देऊन 5 हजार रुपये वसूल करण्यात आले होते. तर अधिक रकमेसाठी तगादा लावण्यात आला होता. मनोजने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. 

अटक करण्यात आलेला मनोहर पायकण्णावर हा कर्नाटक सिंह गर्जना संघटनेचा अध्यक्ष आहे. तर नागराज हा कन्‍नड रक्षण वेदीकेचा जिल्हा संचालक व 'जुल्मसे जंग' चा पत्रकार आहे. सर्व संशयितांवर दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हे विभागाच्या उपायुक्‍त यशोदा वंटगोडी, मार्केट एसीपी नारायण बरमणी, एसीपी महांतेश्‍वर जिद्दी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्ष संगमेश शिवयोगी आदींनी कारवाईत भाग घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT