नगर : तालुका प्रतिनिधी
माजी खासदार दादा पाटील उर्फ मारुती देवराम शेळके यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कार्यरत असलेला झंजावात अखेर निमाला. त्यांच्यावर काल (दि.23) दुपारी 3 वाजता नगर तालुक्यातील खारे कर्जुने या गावी दादा पाटील शेळके माध्यमिक विद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र व जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब पाटील शेळके यांनी त्यांना अग्नी दिला.
दोन वेळा नगर दक्षिणेचे खासदार व चार वेळा नगर-नेवासा मतदारसंघाचे आमदार म्हणून दादा पाटील शेळके यांनी जनसेवा केली. 1962 पासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. नगर तालुक्यात अपक्ष आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. तर 1979 पासून काँग्रेस विचारांच्या सोबत ते राहिले. 1962 पासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झालेला राजकीय प्रवास खासदार म्हणून 1996 पर्यंत कायम राहिला. कोणत्याही सत्तेवर प्रत्यक्ष नसताना दादा पाटील सक्रिय राजकारणात मात्र अखेरपर्यंत कार्यरत राहिले़
आशिया खंडात अग्रगण्य समजल्या जाणार्या जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळले. नगर तालुक्यातील अनेक पाझर तलावांची कामे त्यांच्या काळात झाली.
तालुक्यातील शेतकर्यांसाठी त्यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मात्र, पुरेशा उसाअभावी व सततच्या दुष्काळामुळे कारखाना चालविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. शेतकर्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती त्यांनी केली. जिल्हा दूध संघावरही अनेक वर्षे त्यांची सत्ता अबाधित राहिली. जिल्ह्यातील शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. नगर तालुक्याला एकाच वेळी सुमारे आठ कोटी रुपयांचा विमा मिळवून देण्यातही त्यांची भूमिका मोठी होती. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अनेक गावांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना परवानगी मिळवून देण्यात त्यांनी ठोस भूमिका पार पाडली. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर काम करताना संस्थेच्या अनेक शाखांना मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
दादा पाटील शेळके यांच्या पाठीमागे चिरंजीव रावसाहेब शेळके यांच्याबरोबरच पत्नी, तीन मुली, तसेच पुतणे प्रताप पाटील व चार पुतण्या, नातू असा मोठा परिवार आहे. शेळके यांच्या अंत्यसंस्काराला बद्रीनाथ महाराज तनपुरे, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र नागवडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.