कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पाटाकडील तालीम मंडळाचे माजी फुटबॉल गोलरक्षक व एस.टी. महामंडळाचे कर्मचारी शब्बीर गुलाब नायकवडी (वय 53, रा. आर.के.नगर) यांना शनिवारी ज्येष्ठ खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण सामन्यानंतर जल्लोष करीत असताना हृदयविकाराचा तीव— झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मनाला चटका लावणार्या या घटनेमुळे फुटबॉल खेळाडूंसह मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनमुळे फुटबॉल सामन्यांना मनाई केली आहे. त्यामुळे खेळाचा आनंद घेता यावा, यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी एकत्रित येऊन मैत्रीपूर्ण सामन्यांचे कृत्रिम मैदानावर आयोजन करतात. काही फुटबॉलप्रेमींनी बेलबागेतील एका कृत्रिम अॅस्टोटर्फ मैदानावर अशा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात एका संघामध्ये शब्बीर हे गोलरक्षक म्हणून खेळत होते. सामना बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी घेण्याचा पंचांनी निर्णय घेतला. त्यात नायकवडी यांनीही एक पेनल्टी मारली. हा फटका गोलपोस्टला लागून बाहेर आला. त्यामुळे गोल झाला की नाही, ही बाब चित्रीकरण करणार्यांनी बघून गोल झाल्याचे दाखविले. त्यानंतर नायकवडी यांचा आनंद गगनात मावेना. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मैदानावर उपस्थितांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.