Uncategorized

हर्णै बंदरात मासळी लिलाव मंदावला

Pudhari News

दापोली : प्रवीण शिंदे

मासळी लिलावातून रोजची लाखो रुपयांची उलाढाल होणार्‍या हर्णै बंदरात  अनेक दिवसांपासून मासळी लिलाव प्रक्रिया मंदावली आहे. गेले सहा महिने येथील मच्छीमार बांधव अनेक वादळांचा सामना करत आहेत. येेथील संपूर्ण आर्थिक गणित हे मच्छीमार व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, समुद्रात आलेली अनेक वादळे आणि आस्मानी संकटे यामुळे हर्णै  येथील आर्थिक गणित बिघडले आहे. मासेमारीसाठी समुद्रात अनुकूल वातावरण नसून रोजच वातावरणात चढ-उतार आहे. त्या मुळे समुद्रात भीतीचे सावट अजूनही मच्छीमारीसाठी कायम आहे. 

मागील सहा महिन्यांपासून अनेक मासेमारी नौका हर्णै बंदर,आंजर्ले खाडी आदी ठिकाणी आश्रयाला उभ्या आहेत.त्यामुळे समुद्रातील मोठी मासेमारी बंदच आहे. नारळी पौर्णिमेनंतर कायम गजबजनारे हर्णै बंदर या वर्षी अधून मधून सुने सुने आहे. वादळाच्या भीतीने अनेक दिवस पर्यटकांनी देखील दापोलीकडे म्हणावीतशी पावले वळविली नाहीत. त्यामुळे येथील आर्थिक गणित कोलमडले आहे. हर्णै बंदरात कायम ओल्या मासळीची उचल मोठ्या प्रमाणात असते. लिलाव प्रक्रिया देखील अनेकदा लाखात असते. मात्र, समुद्रातून मासळी येण्याचे प्रमाण कमी झाल्याने लिलावात मासळी काही प्रमाणातच येत आहे. वातावरणात रोजचा चढ उतार होत असल्याने लांब पल्याच्या मासेमारी बोटी अर्ध्यावरूनच  बंदराच्या दिशेने येत आहे. हवामान विभागाने देखील अजून वादळसदृश्य स्थिती असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे अनेक मासेमारी नौका किनार्‍याच्या आश्रयाला उभ्या असून अनेक कोळी बांधव आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. 

या आधी वादळी पावसामुळे येथील कोळी बांधवांच्या लहान होड्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने याची अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. आधीच आर्थिक संकटात गुरफटलेले कोळी बांधव मासेमारीचे नवीन धाडस करण्यास धजत नाही. त्यामुळे मासेमारी उलाढाल थंडावली आहे. अस्मानी आणि वादळी संकट सहा महिन्यांपासून हर्णै बंदरात कोळी बांधवांच्या मागे आहे. त्यामुळे येथील मच्छीमार आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. त्यामुळे लिलावात देखील रोजचीच मंदी आहे. शासनाने कोळी बांधवांचा विचार करावा .

अस्लम अकबानी

माजी सरपंच, हर्णै

मासळी मिळण्याचे प्रमाण कमीच…

हर्णै बंदरात ओली मासळी येण्याचे प्रमाण कमी होत असताना बंदरात चांगल्या प्रतीची सुकी मासळी किरकोळ दरात विकली जात आहे.पर्यटकदेखील सुक्या मासळीची खरेदी करत आहेत. सुक्या मासळीची लिलाव प्रक्रिया होत नसली तरी अनेक पर्यटकांची या मासळीला अधिक पसंती आहे. 

SCROLL FOR NEXT