हंजगी : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुका हा नेहमीच तूर उत्पादनात अग्रेसर आहे. यंदाही तुरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे तुरीचे नुकसान झाले असून, तुरीच्या पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी दिवसरात्र पिकांची जपणूक करत तुरीवर औषधांची फवारणी करत आहे.
मध्यंतरी अवकाळी व परतीच्या पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. याच पावसाचा परिणाम तुरीच्या पिकावरही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शेतकरी तुरीच्या पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात तुरीच्या पिकावर कीटकनाशक औषधांची फवारणी करताना दिसतात. खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे.
तूर हे खरीप हंगामातील पीक असले तरी, हे रब्बी हंगामात पक्व होत असल्यामुळे या पिकांवर खरीप तसेच रब्बी हंगामातील कीडी आढळून येतात. पेरणीपासून पीक निघेपर्यंत 200 प्रकारच्या कीडींचा प्रादुर्भाव तुरीच्या पिकावर होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. फुले व शेंगावर होणार्या कीडीचे आक्रमण हे सर्वात जास्त नुकसानकारक असते. कधी कधी मोठ्या स्वरूपात कीड झाल्यास 70 टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणार्या विविध कीडींपासून होते. वेळीच तुरीच्या पिकावरील कीड व रोग नियंत्रण केल्यास बरेच नुकसान टाळता येईल, म्हणून तालुक्यातील शेतकरी दिवसरात्र एक करून तुरीच्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. सध्याची वेळ ही कीड नियंत्रणाची असल्याने अक्कलकोट तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कीड नियंत्रणासाठी तुरीच्या पिकावर दिवसरात्र फवारणी करताना दिसतात.
मध्यंतरी आलेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे तुरीचे पीक सध्या संकटात सापडले आहे. आता पाऊस थांबल्याने शेतकरी तुरीच्या पिकाकडे लक्ष देताना दिसतात. सध्या तुरीच्या पिकाला पोषक वातावरण असल्याने तुरीच्या पिकाची वाढ ही समाधानकारक झाली आहे. पाऊस चालू होता, तेव्हा शेतामध्ये ओलावा होता. वाफसा नसल्याने औषध फवारणी करणे शेतकर्यांना शक्य नव्हते. या दरम्यान तुरीच्या पिकावर किडीचे प्रमाण वाढले होते. आता पावसाने उघडीप दिल्याने व शेतात वाफसा आल्याने बहुसंख्य शेतकरी तुरीवरील कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना दिसतात. या औषध फवारणीच्या कामात शेतकर्यांच्या कुटुंबातील लहानांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वजण औषध फवारणी कामात गुंतल्याचे दिसतात. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्यांच्या शेतातील तुरीची फुले गळून पडले आहेत. काही शेतकर्यांचे पीक पाणी लागून वाळून गेले आहेत, तर काही शेतकरी उरलेले किमान पीक तरी हाती लागावे म्हणून सध्या धडपड करताना दिसतात.