मांजर्डे (जि. सांगली) : वार्ताहर
मांजर्डे परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मागील दोन महिन्यांपासून बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. झाडावरील सर्वच हळकुज गळून बाग वाया गेल्यामुळे मांजर्डे (ता.तासगाव) येथील सुभाष मोहिते यांनी आपली बाग तोडली आहे.
मांजर्डे येथे सुभाष मोहिते यांची आरवडे रोडला १ एकर थामसन वाणाची द्राक्षबाग आहे. बागेची छाटणीनंतर झाडांवर सरासरी ७० ते ८० घड आले होते. मागील दोन महिन्यांपासून या भागात सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे बागेत सर्वत्र पाणी साचले होते. द्राक्ष बागेची छाटणी नंतर झालेल्या मुसळधार पाऊसाने सर्व घड कुजले, सर्व बागेत आलेल्या दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली आहे. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते.
त्यामुळे शेतकरी नाराज झाला होता. माल नसल्यामुळे यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे. हे ओळखून शेतकऱ्याने कुऱ्हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास ९ लाखांचे नुकसान झाले आहे. बागेसाठी औषधे, मजूरी, खते यासाठी केलेला दीड खर्च केला होता, तो सुद्धा वाया गेला आहे. पाऊस व रोगांमुळे यापुढे आर्थिक नुकसान नको म्हणून हे पाऊल उचलले आहे.
कर्जमाफीची मागणी
मोहिते यांनी द्राक्ष बागेसाठी सोसायटीकडुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज काढले आहे. बागच वाया गेल्यामुळे आता हे कर्ज कसे भरायचे, कुटुंबास कसे सांभाळायचे असे प्रश्न पडले आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी सुभाष मोहिते यांनी केली आहे.