सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर सध्या 7.84 टक्के आहे. तो पाच टक्क्यांपेक्षा जास्त आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्हा तिसर्या टप्प्यातच स्थिर आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व व्यवहार करण्यास दि. 28 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. इतर व्यवहार मात्र वीकेंड लॉकडाऊनला कडकडीत बंद राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
ते म्हणाले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर सध्या 7.84 टक्के आहे. व्यस्त ऑक्सिजन बेड देखील 25 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे टक्केवारीमध्ये जिल्हा तिसर्या टप्प्यातच स्थिर राहिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना देखील शिथिलता देण्यात आली आहे. त्यांना आता दि. 28 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. परंतु, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्व बंदच राहतील. रुग्णालये, लसीकरण केंद्रे,
औषध दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट, किराणा दुकाने, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध व दुग्ध पदार्थ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स, सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने इत्यादींना सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच दूध संकलन करण्यास मात्र कोणत्याही वेळेचे बंधन नाही. शेती विषयक सर्व दुकानांना यापूर्वीच दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान 50 टक्के क्षमतेने सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु करमणूक, मॉल्स, शॉपिंग सेंटर, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सभागृहे, जलतरण तलाव बंदच राहतील. धार्मिक स्थळांमध्ये केवळ पुजार्यांना परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना दर्शनासाठी बंदीच आहे.
क्रीडांगणे आणि मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. चित्रपट, मालिका, जाहिरातींचे छायाचित्रण करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
तसेच राज्याबाहेरील कोणतेही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्या परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास संबंधित परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
हे व्यवहार 'जैसे थे'
सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी 'जैसे थे'
जिल्ह्यात चित्रपट, मालिका चित्रीकरणास परवानगी
50 टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास हॉटेल, रेस्टॉरंट, बारचालकांना परवानगी
शासकीय, खासगी वाहतूक सुरू अत्यावश्यक सेवांतील सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार सलून, जीम सुरू राहणार क्रीडांगणे, मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 पर्यंत पूर्ववत परवानगी
अद्याप तरी हे बंदच…
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद.
शाळा, महाविद्यालये, खासगी क्लास बंद धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मॉल, जलतरण तणाव, सभागृह बंदच भाजी मंडई वगळता सर्व आठवडा बाजार अद्याप तरी बंदच राहणार.